नवी दिल्ली - प्रत्येक भारतीयाच्या डीएनएमध्ये लोकशाही आहे, असे प्रतिपादन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय लोकशाही मूल्यांची प्रशंसा केली. पंतप्रधान हे जी-७ शिखर परिषदेसाठी दोन दिवसांच्या जर्मनी दौऱ्यांवर असून त्यांचे रविवारी म्युनिकमध्ये आगमन झाले. म्युनिक येथे भारतीय समुदायाच्या लोकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. त्यानंतर, आज ते परिषदेसाठी हजर राहिले असता मोदींचे आणि भारताचा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रभाव दिसून आला. विशेष म्हणजे भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी मोदींचा हा व्हिडिओ शेअर केला आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी मोदींचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यामध्ये, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना हस्तांदोलन करण्यासाठी चक्क पाठिमागून येऊन त्यांना बोलवताना दिसत आहेत. मोदींच्या खांद्यावर हात ठेवून ते मोदींना बोलवतात, त्यानंतर मोदी पाठिमागे वळून पाहतात आणि जो बायडन यांच्या हातात हात देतात. पंकजा मुंडेंनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, आपल्या मातीवर प्रेम.. गरिबांची सेवा आणि समभाव. जागतिक पातळीवर देशाभिमान आणि प्रभाव.. असे कॅप्शनही पंकजा यांनी दिले आहे.
भारत ही लोकशाहीची जननी
ऑडी डोम इनडोअर एरिनामध्ये आयोजित एका कार्यक्रमात भारतीय समुदायाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ४७ वर्षांपूर्वी लोकशाहीला ओलीस ठेवणे आणि लोकशाही तुडविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आणीबाणी भारताच्या चैतन्यपूर्ण लोकशाहीवरील काळा डाग आहे. आम्हा भारतीयांना लोकशाहीचा अभिमान वाटतो. भारत लोकशाहीची जननी आहे, असे प्रत्येक भारतीय गर्वाने म्हणू शकतो. भारताने रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धावेळी घेतलेली भूमिका, तसेच कोविड काळात जगातील अनेक देशांना केलेली मदत. यामुळे अमेरिकेलाही भारताचा हेवा वाटत आहे. त्यातूनच जो बायडन यांनाही मोदींच्या भेटीची ओढ लागली असावी.