रशिया आणि युक्रेनमधील वाद चिघळला असून गेल्या 69 दिवसांपासून तिथे युद्ध सुरू आहे. याच दरम्यान हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. युद्धात दोन्ही पाय गमावणाऱ्या एका नर्सच्या लग्नाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. युक्रेनमध्ये युद्ध सुरू असताना प्रेम जिंकलं आहे. युक्रेनच्या लवीव शहरात एक जोडप्याने आपल्या लग्नाचा आनंद साजरा केला. सध्या या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.
लवीव मेडिकल असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ ओक्साना नावाच्या एका नर्सचा आहे. 27 मार्चला ओक्साना आपला होणारा पती विक्टर याच्यासोबत जात होती. त्यावेळी झालेल्या एका ब्लास्टमुळे ती भयंकर जखमी झाली. या ब्लास्टमध्ये सुदैवाने विक्टरचा जीव वाचला. पण ओक्सानाला आपले दोन्ही पाय गमवावे लागले. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची चार ऑपरेशन करण्यात आली.
विक्टरने ओक्सानाची साथ कधीच सोडली नाही. ओक्सानाला लवीवमधल्या हॉस्पिटलमध्ये आणलं होतं. या दोघांनीही या हॉस्पिटलमध्येच लग्न केलं. वॉर्डमध्ये लग्न केल्यानंतर विक्टरने ओक्सानाला उचलून घेऊन डान्स केला. त्यावेळी तिथं उपस्थित असलेले वैद्यकीय कर्मचारी आणि इतर रुग्णांनीही टाळ्या वाजवत त्यांना शुभेच्छा दिल्या.
ओक्सानाच्या लग्नाची बातमी युक्रेनच्या एका खासदारानेही शेअर केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ओक्साना आता कृत्रिम पाय बसवण्याच्या तयारीत आहे. या सर्जरीसाठीच ओक्सानाला लवीवच्या हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं आहे. काही दिवसांमध्ये तिची प्रोस्थेटिक सर्जरी पार पडणार असल्याचं सांगण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिलं आहे.