पाकिस्तानमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोट्यवधी लोकांनी पुराचा फटका बसला असून आतापर्यंत एक हजाराहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. जनजीवन विस्कळीत झालं असून मोठंन नुकसान झालं आहे. पाकिस्तानमधील अनेक भागांत आलेल्या पुराचा तब्बल 3 कोटी 3 लाख नागरिकांना फटका बसला. एक हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1456 जण जखमी झाले. या संकटानंतर शहबाज शरीफ यांच्या सरकारला मदत कार्यासाठी शनिवारी लष्कराला पाचारण करावे लागले.
पाकिस्तानच्या आपत्ती व्यवस्थापन दलाने दिलेल्या माहितीनुसार, तीन हजार किलोमीटर पेक्षा अधिक रस्ते, 150 पूल आणि तब्बल सात लाख घरं वाहून गेली आहेत. पाकिस्तानमधील हवामान विभागाने पुढील आठवडय़ात जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. पुरामुळे सध्या निम्म्याहून अधिक देश पाण्याखाली आहे. मोसमी मुसळधार पावसामुळे अचानक आलेल्या पुरात लाखो नागरिक बेघर झाले. 57 लाख नागरिक बेघर झाले आहेत.
पुरात रस्ते आणि पुल गेले वाहून
पुराचा सर्वाधिक तडाखा खैबर-पख्तूनख्वा, बलूचिस्तान आणि सिंध या प्रांतांना बसला आहे. या भागात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस पडत आहे. पुरात रस्ते आणि पुल वाहून गेले असल्याने अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. शेतीचेही मोठे नुकसान झाले असून मोठय़ा प्रमाणात प्राण्यांचा बळी गेला आहे. पुराची भीषणता दाखवणारे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.