ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 27- पाकिस्तानच्या संसदेला गुरूवारी युद्धाच्या आखाड्याचं स्वरूप आलं होतं. विरोधी पक्ष आणि सत्ताधा-यांमध्ये चांगलाच राडा पाहायला मिळाला. दोन्ही पक्षांच्या सदस्यांमध्ये धक्का-बुक्कीही झाली.
पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) पक्षाचे नेते शाह महमूद कुरेशी हे सभागृहाला संबोधित करत असताना त्यांच्या पक्षाच्या सदस्यांनी नवाज शरीफ सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू केली. यावर सत्ताधारी पीएमएल-एन पक्षाचे खासदार शाहिद अब्बासी यांनी कुरेशी यांना पक्षातील सदस्यांना शांत राहण्याची विनंती करण्यास सांगितले तरीही घोषणाबाजी सुरूच होती.
डॉन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार अब्बासी हे दुस-यांदा कुरेशींच्या जवळ जाऊन समजावण्याच्या प्रयत्नात असताना पीटीआयचे सदस्य त्यांना आडवे आले. त्यानंतर दोन्ही बाजुंनी घोषणाबाजीला सुरूवात झाली. अब्बासी यांनी पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खानबाबत अवमानजनक वक्तव्य केलं असा आरोप करण्यात आला आणि काहीवेळाने दोन्ही गटात हाणामारी झाली. डॉन न्यूजने जारी केलेल्या व्हिडीओ फुटेजमध्ये दोन्ही पक्षाचे सदस्य धक्का-बुक्की करताना दिसत आहेत.
या घटनेनंतर संसद 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आली. पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी संबंधित पनामा लीक्स प्रकरणावर पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यावरूनच पाकिस्तानच्या संसदेत राडा झाल्याचं सांगितलं जात आहे.
व्हिडीओ पाहण्यासाठीइथे क्लिक करा-