नवी दिल्ली - देशाचे नागरिक आणि पंतप्रधान म्हणूनही नरेंद्र मोदी कायमच तिरंग्याचा सन्मान करतात. देशातील प्रत्येक भारतीयांना तिरंग्याप्रती सन्मान आदर आहे. सध्या ब्रीक्स परिषद सुरू असल्याने नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे मोदींसह ५ देशाचे प्रमुख उपस्थित आहेत. ब्रिक्स बिझनेस फोरम लीडर्स काऊन्सिलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषण केले. १०० पेक्षा जास्त युनिकॉर्नसह भारतामध्ये जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम असल्याचं मोदींनी यावेळी सांगितलं. दरम्यान, येथील परिषदेत मोदींची एक लहानशी कृती देशाभिमान आणि तिरंग्याचा सन्मान दाखवणारी दिसली.
एएनआयने एक व्हिडिओ ट्विटर आणि युट्यूबवरुन शेअर केला आहे. त्यामध्ये, दक्षिण आफ्रिकेच प्रमुख आणि पंतप्रधान मोदी हे एका व्यासपीठावर येतान दिसत आहेत. मात्र, ज्या व्यासपीठावर मोदींसह इतरही देशाचे प्रमुख एकत्र उभे राहणार आहेत. त्या व्यासपीठावर खाली प्रत्येक देशाचा कागदी ध्वज ठेवण्यात आला होता. मात्र, व्यासपीठावर जाताच मोदींनी जमिनीवर तो ध्वज खाली वाकून उचलला आणि आपल्या जॅकेटच्या खिशात ठेवला. मोदींची ती कृती पाहून तिथील एक अधिकारी धावतच व्यासपीठाकडे आला. त्याने द. आफ्रिकेच्या प्रमुखांकडून त्यांचा ध्वज घेतला. त्यावेळी, मोदींकडेही तिरंगा ध्वज मागितला. मात्र, मोदींनी तो न देता स्वत:कडे ठेवला.
मोदींच्या या कृतीनंतर व्यासपीठावरील इतर देशांचे कागदी ध्वज नेण्यासाठी तेथील संबंधित अधिकारी आले आणि ध्वज घेऊन गेले. मात्र, मोदींनी दाखवलेला देशाभिमान आणि तिरंग्याचा केलेला सन्मान लक्षवेधी आणि कौतुकास्पद ठरला. मोदींच्या या कृतीचं सोशल मीडियावर कौतुक होत असून एएनआयने हा व्हिडिओ ट्विट केला आहे. सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.