- ऑनलाइन लोकमत
सिंगापूर, दि. 22 - सिंगापूरचे पंतप्रधान ली सियेन लूंग एका कार्यक्रमात भाषण करता करता अचानक बेशुद्ध पडले. ली सियेन लूंग दोन तास सलग भाषण करत होते. भाषणामुळे त्यांना इतका थकवा आला की ते बेशुद्ध पडले. पंतप्रधान बेशुद्ध पडल्याने हॉलमधील उपस्थित लोक प्रचंड घाबरले होते. मात्र काही वेळातच ली सियेन लूंग शुद्धीवर आले. यावेळी लोकांनी टाळ्या वाजवून ली सियेन लूंग यांचं कौतुक केलं.
पंतप्रधान ली सियेन लूंग यांना ऐकण्यासाठी हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात लोक जमले होते. शुद्धीवर आल्यानंतर लोकांनी टाळ्या वाजवत त्यांचं स्वागत केलं. पंतप्रधान थकावट आणि डिहायड्रेशनमुळे बेशुद्द पडले असावेत अशी माहिती त्यांच्या जवळच्या सहका-यांनी दिली आहे.
शुद्धीवर आल्यावर पंतप्रधान ली सियेन लूंग यांनी लोकांचे आभार मानले. 'प्रतिक्षा केल्याबद्दल आभार. मी तुम्हा सर्वांना घाबरवलं. मला माहित नाही काय झालं होतं. मी जास्त करुन डॉक्टरांकडे जात नाही. पण जर कधी गेलो तर संपुर्ण चेकअप झाल्याशिवाय निघत नाही', असं त्यांनी सांगितलं. ली सियेन लूंग 2004 पासून सत्तेत आहेत.
64 वर्षीय पंतप्रधान ली सियेन लूंग कॅन्सर पीडित आहेत. 1992 मध्ये त्यांना कॅन्सर झाला होता. डॉक्टरांनी सर्जरी केल्यानंतर ते पुर्णपणे ठीक झाले असल्याचं सांगितलं होतं. ली सियेन लूंग पीपल्स अॅक्शन पार्टीचं नेतृत्व करत आहेत. 70 वर्ष पुर्ण केल्यानंतर पक्षाचं नेतृत्व आपण दुस-याकडे सोपवणार असल्याचं त्यांनी आधीच जाहीर केलेलं आहे.