ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन , दि. 16 -अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आपल्या वादग्रस्त वक्त्वयांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यामुळे जगभरातून त्यांच्यावर वेळोवेळी टीका होत असते. मात्र आता थेट अवकाशातून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.
बुधवारी ऑटोनॉमस स्पेस एजेंसी नेटवर्क (ASAN) ने एफ्रोडाइट-1 नावाचा हवामानाचा फुगा आकाशात सोडला. हा फुगा जवळपास 90 हजार फूट उंचावर गेला. जीपीएस सेन्सर आणि कॅमेरा असलेल्या या फुग्यावर एक ट्विट लावण्यात आलं आहे. यामध्ये ट्रम्प यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्यात आला आहे. एफ्रोडाइट-1 चं हे पहिलं राजकीय बंड आहे अशा आशयाचा इमेल एएसएएनच्या एका सदस्याने वॉशिंगटन पोस्टला पाठवला आहे. वॉशिंग्टन पोस्टने याबाबत वृत्त दिलं आहे.
चंद्रावर चालणारी सहावी व्यक्ती आणि अपोलो 14 मधील अंतराळवीर एडगर मिशेल यांच्याद्वारे हे ट्विट लिहिण्यात आलं आहे. ट्रम्प यांनी नासाच्या पृथ्वी विज्ञान कार्यक्रमासाठीचं बजेट कमी केलं त्याचा विरोध म्हणून आम्ही हा संदेश पाठवला असं एएसएएनच्या एका सदस्याने म्हटलं आहे.