ऑनलाइन लोकमत
काबूल, दि. 14 - अमेरिकेने अफगाणिस्तानच्या भूमीवर आजवरचा सर्वात शक्तीशाली बॉम्ब हल्ला केला. या हल्ल्याचा अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझई यांनी निषेध केला आहे. अशा प्रकारे बॉम्बफेक अमानवीय असून आमच्या भूमीचा अत्यंत क्रूर कामासाठी गैरवापर केल्याचे करझई यांनी म्हटले आहे.
अमेरिकेसाठी अफगाणिस्तान नव्या आणि घातक शस्त्रास्त्रांची चाचणी करण्याची जागा आहे. अमेरिकेची ही फक्त दहशतवादा विरुद्ध लढाई नाही असे त्यांनी म्हटले आहे.
अमेरिकेने आमच्याबरोबर समन्वय ठेऊन हा हल्ला केला. आम्हाला पूर्ण माहिती होती. नागरीकांना या हल्ल्याची झळ बसू नये यासाठी आवश्यक ती काळजी घेण्यात आली अशी माहिती अफगाण सरकारमधील अधिकारी अब्दुल्लाह यांनी दिली. इसिसचे दहशतवादी या भागातील गुफांचा वापर करायचे अशी माहिती अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली.
अमेरिकेने प्रथमच या सर्वात शक्तिशाली नॉन न्यूक्लिअर बॉम्बचा वापर केला. ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब’ अशी ओळख असणाऱ्या २१ हजार पौंड वजनाच्या या बॉम्बच्या स्फोटाने दहशतवादी जगताला हादरा दिला.