ऑनलाइन लोकमत
क्वालालंपूर, दि. २६ - ऑस्ट्रेलियामधील पर्थ येथून मलेशियाकडे जाणाऱ्या एअर एशियाच्या विमानाला तांत्रिक बिघाडामुळे रविवारी अर्ध्यावरूनचा माघारी बोलावण्यात आले. या विमानातून प्रवास करत असलेल्या प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार हे विमान अचानक वॉशिंग मशिनसारखे हलू लागले. त्यामुळे प्रवाशांची भीतीने गाळण उडाली.
या भीतीदायक अनुभवाबाबत विमानातून प्रवास करत असलेला एक प्रवासी म्हणाला, विमान अचानक हलू लागल्याने मी घाबरलो. भीतीने ओरडू लागलो. माझ्याप्रमाणेच इतर सहप्रवासीसुद्धा ओरडत होते. पण त्यावेळी आम्ही काहीही करण्याच्या मनस्थितीत नव्हतो. आम्ही केवळ वैमानिकावर विश्वास ठेवला आणि सुखरूप परतण्यासाठी देवाची प्रार्थना केली.
क्वालालंपूरकडे जात असलेले विमान एअरबस ए३३० जवळपास ९० मिनिटे या समस्येसोबत झुंजत होते. त्यानंतर त्या विमानाला परत पर्थकडे माघारी बोलावण्यात आले. या एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार वैमानिकाने विमानातील बिघाडाची माहिती दिली. त्यानंतर आणीबाणीचा उपाय म्हणून विमानाला माघारी बोलावण्यात आले. तसेच कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी विमानतळावरील कर्मचाऱ्यांना तयार राहण्यास सांगण्यात आले.या विमानातून किती प्रवासी प्रवास करत होते याबाबत माहिती मिळू शकली नाही. या विमानात नेमके किती प्रवासी होते याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. पण प्रवाशांनी हा प्रवास खूपच भीतीदायक होता, असे सांगितले.