ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 20 - भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईकनंतर धसका घेतलेल्या पाकिस्तानने भारताविरोधात कटकारस्थान रचायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर हिजबुल मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ काश्मीर खो-यातील असून यात एकूण बारा दहशतवादी आहेत. त्यांच्या हातात अत्याधुनिक शस्त्रास्त्र दिसत आहे. तर यातील एक जण लष्करातील गणवेशातही दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये, या दहशतवाद्यांनी फळांच्या बागेत आपला अड्डा बसवला असून न घाबरता हसत-खेळत एकमेकांशी बोलताना , मिठी मारताना दिसत आहेत. त्याच्या हातात इन्सास (INSAS) रायफल्सदेखील दिसत आहेत, ज्या केवळ भारतीय जवानांकडे असतात. भ्याड हल्ले करुन या रायफल्स त्यांनी चोरल्या आहेत.
सर्जिकल स्ट्राईकनंतर सीमारेषेजवळ पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये दहशतवाद्यांकडून सीमारेषेवर भारतीय पोलीस चौक्यातील शस्त्रास्त्र चोरण्याच्या, हिसकावण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. आतापर्यंत जवळपास 67 रायफल्स हिसकावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
याआधी हिजबुल मुजाहिद्दीनचा नवा म्होरक्या झाकिर रशिद भट जो 'मुसा' म्हणून ओळखला जातो, त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. संबंधित व्हिडीओमध्ये मुसा तरुण-तरुणींना दहशतवादी गटात सामील होण्यासाठी सांगत असून त्यांना भारतीय सुरक्षा रक्षकांकडून रायफल्स चोरण्यासाठी, हिसकावण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचे दिसत होते. काश्मीर खो-यामध्ये जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा, हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांनी हात मिळवणी केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
हिजबुल मुजाहिद्दीनचा ठार झालेला दहशतवादी बुरहान वनी सोशल मीडियावर सक्रीय होता. शस्त्रांसहीत फोटो, व्हिडीओ काढून तो भारतीय लष्कराला डिवचण्याचे काम करत होता. काही दिवसांपूर्वीच भारतीय लष्कराच्या चकमकीत बुरहान वनीचा खात्मा करण्यात आला.