टॅफिक सिग्नल ग्रीन झाल्यावरही रस्त्या रोखून धरणाऱ्या बाइकर्सना हटकणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. संतापलेल्या बाइकर्सने महिलेला तिच्या कारमधून बाहेर काढलं आणि रस्त्यावर तिला मारहाण केली. पीडित महिलेची आठ वर्षांची मुलगी रडत रडत आरोपींकडे आईला सोडण्याची विनंती करत राहिली, पण त्यांना काही एक ऐकलं नाही. ही संपूर्ण घटना तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने मोबाइलमध्ये रेकॉर्ड केली. ज्या आधारावर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.
‘द सन’ मध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, ही घटना अमेरिकेतील प्रोविडेंस काउंटीमध्ये घडली. तेव्हा महिलेने हॉर्न वाजवून बाइकर्सना पुढे जाण्यास सांगितलं. कारण ट्रॅफिक सिग्नल ग्रीन झाला होता. याने संतापलेल्या साधारण १० बाइकर्सनी महिलेच्या कारला वेढा दिला. त्यानंतर आरोपींनी महिलेला खेचून बाहेर काढलं आणि तिला मारहाण केली. यादरम्यान पीडितेची मुलगी रडत होती.
धक्कादायक बाब म्हणजे आरोपी बाइकर्समध्ये एका महिलेचाही समावेश होता. तिला पोलिसांनी गुरूवारी अटक केली. नॉर्थ प्रोविडेंस पोलिसांनी सांगितलं की, तीन ऑगस्टला रात्री ११ वाजताच्या सुमारास वॅली स्ट्रीटवर एका महिलेला मारहाण प्रकरणी २४ वर्षीय शायन बोइसवर्टला अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी सांगितलं की, पीडित महिलेने हॉर्न वाजवून बाइकर्सना पुढे जाण्याचा इशारा केला होता. कारण त्यांनी पूर्ण रस्ता रोखून धरला होता. प्रोविडेंस मेअर जॉर्ज एलोर्जने या घटनेवर दु:खं व्यक्त केलं. ते म्हणाले की आरोपींविरोधात कठोर कारवाई केली जाईल. बाइकर्स विरोधात आता अभियान चालवलं जात आहे. आतापर्यंत २०० पेक्षा जास्त बाइक जप्त केल्या आहेत.