ऑनलाइन लोकमत -
न्यूयॉर्क, दि. २० - फ्लोरिडा येथील पाम बीच प्राणीसंग्रहालयात टोपी काढण्यासाठी महिलेने जीव धोक्यात घालत वाघासाठी बांधण्यात आलेल्या कुंपणात उडी मारली. स्टेसी असं 38 वर्षीय महिलेचं नाव आहे. प्राणीसंग्रहालयात वाघाचा पिंजरा आणि सुरक्षाभिंतीदरम्यान असलेल्या जागेत पडलेली टोपी काढण्यासाठी या महिलेने आपला जीव धोक्यात घातला. याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून या व्हिडिओत ही महिला खाली उतरलेली दिसत असून टोपी घेऊन पुन्हा भिंतीवर चढून जाताना दिसत आहे.
प्राणीसंग्रहालयात प्राण्यांपासून धोका होऊ नये किंवा प्राण्यांना लोकाकंडून इजा होऊ नये यासाठी ठरविक अंतरावर सुरक्षाभिंत बांधलेली असते. हे अंतर पार करुन पुढे जाण्याची परवानगी नसते. मात्र स्टेसी या महिलेने जीव धोक्यात घातला आणि सुरक्षाभिंतीवरुन खाली उतरुन टोपी काढण्याचा प्रयत्न केला. स्टेसी आणि वाघामध्ये फक्त कुंपणाच्या हलक्या वायरीचं अंतर होतं.
स्टेसी टोपी घेऊन वरती गेल्यानंतर उपस्थितांनी मात्र तिला चांगलच सुनावलं. उपस्थित एका व्यक्तिशी स्टेसीचा यावरुन वादही झाला. आपल्या मुलांसोबत आलेल्या या व्यक्तीने स्टेसीला मुर्ख म्हटलं. तुझ्या अशा वागण्याने लहान मुलांसमोर चुकीचं उदाहरण उभं राहत असल्याचं त्या व्यक्तीने स्टेसीला सुनावलं.