संयुक्त राष्ट्र : संयुक्त राष्ट्रामधील पाकिस्तानच्या स्थायी सदस्या मलीहा लोधी यांना एका कार्यक्रमातून काढता पाय घ्यावा लागला. कारण त्यांच्यावर या कार्यक्रमात भ्रष्टाचाराचे आरोप करत एका व्यक्तीने खरेखोटे सुनावले आणि तुम्ही लायक नसल्याचे म्हटले. हा व्हिडीओ ट्विटरवर कमालीचा व्हायरल झाला आहे.
लोधी या बऱ्याच वर्षांपासून यूएनमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधीत्व करतात. त्या एका कार्यक्रमावेळी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना एका पाकिस्तानी नागरिकाने रागामध्ये त्यांचा पाणउतारा केला. त्याने सांगितले की, आमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी त्यांच्याकडे एक मिनिटाचाही वेळ नाही. गेल्या 15-20 वर्षांपासून तुम्ही इथे काय केले? तुम्ही आमचे प्रतिनिधीत्व करत नाही आहात. यानंतर लोधी यांनी तेथून उत्तरे न देता काढता पाय घेतला.
या व्यक्तीने लोधी निघत असताना गंभीर आरोप करत, तुम्ही आमचा पैसा चोरत आहात. तुम्ही आमचे प्रतिनिधीत्व करणारे अधिकारी नाहीत. तुम्हाला लाज वाटली पाहिजे, असे म्हणत लोधी यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तेथील लोकांनी या व्यक्तीला शांत करण्याचा प्रयत्न केला.
या घटनेचा व्हिडीओ ट्विटरवर आल्यानंतर पाकिस्तानी लोकांनी लोधी यांना फैलावर घेतले. यावेळी एका युजरने तुम्ही खूप वर्षे अमेरिकेत राहिलात. त्यांना आता पाकिस्तानात परत पाठविले पाहिजे, असे ट्विट केले आहे. तर अनेकांनी लोधी यांनी काहीच केले नसल्याचे म्हटले आहे.