America Joe Biden : पुढच्या वर्षी अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीपूर्वी जो बायडेन यांना तीव्र प्रतिक्रियांचा सामना करावा लागत आहे. मंगळवारी अमेरिकेच्या हवाई दलाच्या एका माजी अधिकाऱ्याने जो बायडेन यांच्या समोर त्यांच्यावर जोरदार टीका केली. मध्य-पूर्वेतील यूएस युद्धांमध्ये जो बायडेन यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तो अधिकारी म्हणाला, 'बायडेन यांचे हात रक्ताने माखलेले आहेत'.
तुम्ही अध्यक्ष होण्यास योग्य नाहीअमेरिकन सैनिक म्हणाला, 'मी वायुसेनेचा निवृत्त सैनिक आहे आणि आर्मीच्या अनुभवी जवानासोबत इथे आलोय. ज्याने युद्धाला पाठिंबा दिला, अशा व्यक्तीला मतदान का करावे, असा प्रश्न आम्हाला पडला आहे. या युद्धांमध्ये आमचे हजारो भाऊ, बहिणी, असंख्य इराकी नागरिक मारले गेले. तुम्ही ते युद्ध घडवून आणले. ते युद्ध करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही पदकही दिले. तुमच्या धोरणांमुळे माझे मित्र मेले. तुमचे हातही रक्ताने माखलेले आहेत. मिस्टर बायडेन, तुम्ही या अध्यक्षपदासाठी पात्र नाही,' अशी खोचक टीका त्याने केली.
माजी सैनिक बोलत राहिला आणि बायडेन शांतपणे ऐकत होते. यानंतर बायडेन म्हणाले, माझा मुलगाही इराक युद्धात लढलाय. तुम्हाला काय वाटतं, मला काही फरक पडत नाही? याचा अर्थ माझ्यासाठी खूप मोठा आहे.' बायडेन यांच्या वक्तव्यावर माजी सैनिक म्हणाला, मला आपल्या मुलाबद्दल जास्त बोलायचे नाही. त्यावर बायडेन यांनी न बोललेलेच बरे, असा इशारा दिला.
यानंतर बायडेन त्या माणसापासून दूर जाऊ लागले, तेव्हा तो ओरडला. 'तुम्ही योग्य नाहीत सर, तुम्ही अपात्र आहात' त्या लोकांचे रक्त तुमच्या हातावर आहे. माझे भाऊ-बहिण इराक आणि अफगाणिस्तानमध्ये मरण पावले आणि तुम्ही हे होऊ दिले. तुम्ही कोणत्याही प्रकारे राष्ट्रपती होण्यास योग्य नाहीत. त्यांना राष्ट्रपती होऊ देऊ नये. जो बायडेनपेक्षा ट्रम्प अधिक युद्धविरोधी आहेत, असे तो म्हणाला. या घटनेनंतर इंटरनेटवर लोक माजी अमेरिकन सैनिकाचे जोरदार कौतुक करत आहेत. तर, माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश जबाबदार असल्याने इराक युद्धासाठी बायडेन यांना जबाबदार धरू नये, असे काहींनी म्हटले.