हनोई : हवेत वेगाने संसर्ग पसरवणाऱ्या कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचा व्हिएतनाममधील संशोधकांनी शोध लावला आहे. भारत व ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या विषाणूंपासून हा विषाणू तयार झाला असल्याचा या संशोधकांचा दावा आहे.व्हिएतनाममध्ये सुमारे सात हजार कोरोना रुग्ण असून त्यातील ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. जगातील अन्य देशांच्या तुलनेत ही संख्या नगण्य असली तरी व्हिएतनाममध्ये कोरोना स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. हनोई, हो चि मिन्ह या शहरांमध्ये कोरोनाचा फैलाव वाढला आहे. त्यामुळे त्या देशाचे आरोग्यमंत्री नुयेन तान्ह लाँग यांनी सांगितले की, भारत व ब्रिटन येथे सापडलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूंचा संयोग होऊन त्यापासून आणखी नवा विषाणू तयार झाला. तो व्हिएतनाममध्ये आढळून येत आहे. या नव्या विषाणूमुळे त्या देशात किती जण बाधित झाले याची माहिती मात्र लाँग यांनी दिली नाही. व्हिएतनाम येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ हायजीन अँड एपिडेमिऑलॉजी या संस्थेने एका निवेदनात म्हटले आहे की, ३२ रुग्णांतील कोरोना रुग्णांचे जीन सिक्वेंसिंग केल्यानंतर व्हिएतनाममधील नव्या विषाणूचा शोध लागला आहे. त्याच्या आधी या देशात कोरोना विषाणूचे सात प्रकार आढळून आले होते. कोरोना साथीला रोखण्यासाठी व्हिएतनामने वर्षभरापूर्वीपासून तातडीने क्वारंटाइन केंद्रे उभारली, कोरोना रुग्णांचा वेगाने शोध घेतला. त्यामुळे या देशात संसर्गाचा फारसा प्रसार होऊ शकला नव्हता. त्याबद्दल विविध संस्थांनी व्हिएतनामचे कौतुकही केले होते. मात्र एप्रिलपासून या देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने तेथील राज्यकर्ते व संशोधक चिंतित झाले आहेत. (वृत्तसंस्था)धार्मिक, पर्यटनस्थळे बंदकोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सध्या त्या देशातील हॉटेल, सलून, मसाज पार्लर तसेच पर्यटन तसेच धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. व्हिएतनामची लोकसंख्या ९.७ कोटी असून त्यातील १० लाख लोकांना आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.
CoronaVirus News: धोका वाढला! भारत, ब्रिटनमधील विषाणूपासून व्हिएतनाममध्ये नवा विषाणू तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 6:38 AM