सध्या देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रणही मिळताना दिसत आहे. परंतु अशा परिस्थितीत एक चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. व्हिएतनामच्या आरोग्यमंत्र्यांनी एक मोठी माहिती दिली आहे. व्हिएतनाममध्ये कोरोनाच्या एका नव्या व्हेरिअंटचा शोध लागल्याची माहिती त्यांनी दिली. तसंच हा भारत आणि ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोना व्हेरिअंटपासून तयार झालेला हायब्रिड व्हेरिअंट असून तो तेजीनं हवेत पसरत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. नवा व्हेरिअंट हा भारत आणि ब्रिटनमध्ये सापडलेल्या व्हेरिअंटपासून तयार झालेला नवा कोविड हायब्रिड व्हेरिअंटचा शोध लागल्याचं व्हिएतनामचे आरोग्यमंत्री गुयेन थानं लाँग यांनी म्हटलं. "या व्हेरिअंटमुळे चिंता वाढली आहे. तसंच हा अन्य व्हेरिअंटच्या तुलनेत वेगानं हवेत पसरतो," असंही ते म्हणाले.
यासंदर्भात सविस्तर माहिती दिली जाईल, असंही गुयेन थान लाँग यांनी म्हटलं, याशिवाय जागतिक आरोग्य संघटनेकडून मात्र याबाबत कोणतंही वक्तव्य समोर आलेलं नाही. यापूर्वी भारतात सापडलेल्या व्हेरिअंटला B.1.617.2 आणि ब्रिटनमध्ये सापडलेल्या व्हेरिअंटला B.1.1.7 असं नाव देण्यात आलं होतं. व्हिएतनाममध्ये एप्रिल महिन्यापासून पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहिती एप्रिल महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात व्हिएतनामच्या ६३ पैकी ३१ शहरांमध्ये कोरोनाचे ३६०० नवे रुग्ण सापडले होते. देशातील एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येच्या ते ५० टक्के इतके आहेत.