उत्तर व्हिएतनामध्ये यागी वादळाने वादळाने कहर केला आहे. परिणामी भूस्खलन आणि अचानक आलेल्या पुरामुळे संपूर्ण गाव उद्ध्वस्त झाले. यात १५५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १४१ बेपत्ता आहेत. शेकडो लोक जखमी झाल्याची माहिती आहे.
लाओ काई प्रांतातील पुरामुळे मंगळवारी ३५ कुटुंबांचे लांग नु गाव माती आणि ढिगाऱ्याखाली गाडले गेले. यात आतापर्यंत फक्त १२ जण जीवंत सापडल्याची माहिती आहे. बचाव कर्मचाऱ्यांनी ३० मृतदेह बाहेर काढले आहेत. यागी हे दक्षिणपूर्व आशियाई देशात दशकांमधले सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ आहे. शनिवारी ताशी १४९ किलोमीटर वेगाने वारे वाहत होते.
"भारतानं पुतिन यांना दिलाय 'फोर पॉइंट फॉर्म्युला", आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार?
रविवारीही मुसळधार पाऊस सुरूच होता. नद्या धोकादायक पातळीवर आहेत. टूर मार्गदर्शक वान ए पो यांनी सांगितले की, भूस्खलन आणि सततच्या पावसामुळे प्रांतातील अनेक रस्ते बंद झाले आहेत. हवामानामुळे विमानसेवाही बंद आहे.
पर्यटन हे स्थानिक अर्थव्यवस्थेचे मुख्य स्त्रोत आहे. स्थानिकांनी सांगितले की, आता घरी परत जाऊ शकत नाहीत कारण तेथून त्यांच्या गावापर्यंतचा १५ किलोमीटरचा रस्ता खराब झाला आहे.
याआधी सोमवारी, फु थो प्रांतातील लाल नदीवरील पूल कोसळला आणि दोन मोटारसायकलींसह १० कार आणि ट्रक नदीत वाहून गेले. डोंगराळ काओ बांग प्रांतात भूस्खलनामुळे २० जणांना घेऊन जाणारी बस पुराच्या प्रवाहात वाहून गेली.