प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ 'सॉल्ट बी'ची नक्कल करून सरकारी अधिकाऱ्याची खिल्ली उडवल्याबद्दल व्हिएतनाममधील एका नूडल विक्रेत्याला साडेपाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात न्यायालयाने नूडल विक्रेत्याला राज्यविरोधी प्रचाराअंतर्गत दोषी ठरवून तुरुंगात पाठवले.
व्हिएतनाममध्ये कम्युनिस्ट पक्षाची सत्ता आहे. येथील कम्युनिस्ट पक्ष स्वत:वर कोणत्याही प्रकारची टीका स्वीकारत नाही. या नूडल विक्रेत्यावर सेलिब्रिटी शेफ 'सॉल्ट बी'ची नक्कल केल्याचा आरोप करण्यात आला आणि तिथल्या उच्च सरकारी अधिकाऱ्याला टार्गेट करून त्याची खिल्ली उडवली.
बुई तुआन लाम (Bui Tuan Lam) असे या नूडल विक्रेत्याचे नाव आहे. बुई तुआन लाम याला गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती. नोव्हेंबर 2021 मध्ये 39 वर्षीय बुई तुआन लाम याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये तो प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ 'सॉल्ट बी'ची नक्कल करताना दिसला.
व्हिएतनामी सरकारवर टीका केल्याबद्दल बुई तुआन लाम याला अटक करण्यात आली होती. व्हिएतनामचा एक उच्च सरकारी अधिकारी लंडनमधील एका रेस्टॉरंटमध्ये सोन्याचे अर्क लावून जेवण करत होता. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.
हे हॉटेल प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ 'सॉल्ट बी'चे होते. 'सॉल्ट बी' हा तुर्कीचा प्रसिद्ध शेफ आहे. त्याचे खरे नाव नुसरेत गोकसे आहे. त्या हॉटेलमध्ये महागडे जेवण केल्यामुळे बुई तुआन लामने सरकारी अधिकाऱ्यावर निशाणा साधला. यासोबतच त्याने 'सॉल्ट बी'ची नक्कल करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता.
सरकारची बदनामी करणारे 19 लेख आणि 25 व्हिडिओव्हिएतनामी सरकारला बदनाम केल्याच्या आणि कागदपत्रे आणि माहिती प्रसारित केल्याच्या आरोपाखाली बुई तुआन लाम याला गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती. यापूर्वीही नूडल विक्रेत्यावर असे अनेक आरोप झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की, सरकारची प्रतिमा खराब करणारे लामने सोशल मीडियावर 19 लेख आणि 25 व्हिडिओ पोस्ट केले होते.