वॉशिंग्टन - चांद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लँडरचे चंद्राच्या पृष्ठभागावर क्रॅश लँडिंग झाल्याने इस्रोसह कोट्यवधी भारतीयांची निराशा झाली होती. मात्र त्यानंतरही विक्रमशी संपर्क साधला जाईल अशी आशा देशाला होती. मात्र विक्रमशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करणे हे अशक्यप्राय झाले असल्याचे शास्त्रज्ञांनी केलेल्या प्राथमिक तपासात समोर आले. 'नासा' या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने 'चांद्रयान-2' मोहिमेतील विक्रम लँडरचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. 'विक्रम' लँडरचे चंद्रावर हार्ड लँडिंग झाले असल्याचं नासाने या फोटोंच्या आधारे स्पष्ट केले आहे. नासाने प्रसिद्ध केलेले हे हाय रेझॉल्यूशन फोटो ऑर्बिटरद्वारे घेण्यात आले आहेत.
विक्रम लँडरने चंद्रावरील एका भूमीवर उतरण्याचा प्रयत्न केला, मात्र विक्रमचे हे उतरणे अपेक्षेनुसार झाले नाही. यानंतर 7 सप्टेंबरला विक्रमचा इस्रोशी संबंध तुटला. विक्रमचे चंद्रावर हार्ड लँडिंग झाल्याचं स्पष्ट असल्याचं नासाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. विक्रम नेमक्या कोणत्या जागी आदळले हे अजूनही निश्चितपणे सांगता येत नाही. मात्र हे फोटो 150 किमी अंतरावरून काढण्यात आले असल्याची माहिती नासाच्या वतीने देण्यात आली आहे.
नासाचे ऑर्बिटर (एलआरओ) विक्रम जेथे उतरले त्या जागेवरून 17 सप्टेंबर या दिवशी गेले. त्याच वेळी हे हाय रेझॉल्यूशन फोटो टिपण्यात आल्याचे नासाने म्हटले आहे. मात्र एलआरओसीच्या टीमला फोटो आणि लँडरच्या ठिकाण कोणते आहे हे ओळखता आलेले नाही. नासाचे ऑर्बिटर पुन्हा एकदा लँडिंग ठिकाणाजवळ पोहोचण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नासाने म्हटले आहे. 14 ऑक्टोबर या दिवशी प्रकाशाची स्थिती चांगली असेल आणि याचाच फायदा घेत पुन्हा फोटो टिपण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
भारताच्या चांद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग अपयशी ठरल्यानंतरही देशभरातून इस्रोला पाठिंबा मिळाला होता. दरम्यान, भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने चांद्रयान-2 मोहिमेला मिळालेल्या पाठिंब्यासाठी देशवासियांचे आभार मानले आहेत. तसेच जगभरात वसलेल्या भारतीयांची स्वप्ने साकार करण्यासाठी प्रयत्न करत राहू, असे आश्वासन दिले. इस्रोने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हे ट्विट केले होते. ''आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल तुमचे आभार. जगभरातील भारतीयांच्या अपेक्षा आणि स्वप्नांच्या बळावर आम्ही सातत्याने पुढे जात राहू,'' असे इस्रोने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.
पृथ्वीपासून चंद्रापर्यंतच्या आपल्या 47 दिवसांच्या प्रवासात चांद्रयान-2 ने अनेक अवघड टप्पे पार केले. मात्र शेवटचा टप्पा पार करताना विक्रम लँडरशी असलेला संपर्क तुटून त्याचे चंद्राच्या पृष्ठभागावर हार्ड लँडिंग झाले होते. त्यानंतर चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरने चंद्राच्या पृष्टभागावर पडलेल्या विक्रम लँडरचे छायाचित्र पाठवले होते. मात्र विक्रमशी संपर्क साधण्याचा सातत्याने प्रयत्न केल्यानंतरही त्यात अद्याप यश आलेले नाही. विक्रमशी अद्याप संपर्क होऊ न शकल्याने विक्रम लँडरमध्ये असलेल्या रोव्हर प्रज्ञानच्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागावरील माहिती मिळवण्याचा कार्यात अडचण निर्माण झाली आहे. मात्र असे असले तरी इस्रोसह जगभरातील अंतराळ संशोधन संस्था आणि शास्रज्ञांनी चांद्रयान-2 मोहीम आपले 95 लक्ष्य प्राप्त करण्यात यशस्वी झाल्याचा दावा केला आहे.