नैरोबी, दि.10- केनियाचे राष्ट्राध्यक्ष उहुरु केन्याटा पुन्हा निवडून यावेत यासाठी मतदान प्रक्रियेत गोंधळ घातला असल्याचा आरोप विरोधकांनी केल्यामुळे झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 5 जणांचे प्राण गेले आहेत. मंगळवारी झालेल्या मतदानात केन्याटा यांनी गोंधळ घातल्याचे विरोधी उमेदवार राईला ओडिंगा यांनी आरोप केला होता.बुधवारी राजधानी नैरोबीमध्ये दोन व्यक्तींची हत्या झाली असल्याचे शहराचे पोलीस प्रमुख जॅपेथ कुमे यांनी स्पष्ट केले.
किसी कौंटीमधील दक्षिण मुगिरॅंगो मतदारसंघात मंगळवारी एका व्यक्तीचा गोळीबारात मृत्यू झाला. तेना रिव्हर रिजनमध्ये पाच तरुणांनी एकत्र येत मतमोजणी केंद्रावर हल्ला केला आणि तेथिल एका व्यक्तीची हत्या केली. हल्लेखोरांपैकी दोघांना पोलिसांनी तात्काळ कंठस्नान घातले. मतदानानंतर जाळपोळ, रस्ते अडवणे, घोषणाबाजी असा प्रकारच्या घटना संपुर्ण केनियामध्ये घडत आहेत. केन्याटा यांचे विरोधी उमेदवार ओडिंगा यांचे गाव किसुमुमध्ये जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा मारा आणि गोळीबार करावा लागला. बुधवारी केनियन निर्वाचन आयोगाच्या संकेतस्थळावर केन्याटा हे 54.5 टक्के मतदानासह आघाडीवर असल्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली होती तर ओडिंगा यांना 44.8 टक्के मतदान झाले असल्याचे यामध्ये दाखवण्यात आले होते. त्यानंतर ओडिंगा यांनी याला विरोध करण्यासाठी नैरोबीमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपल्या पक्षाने व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा ही आकडेवारी पूर्णतः वेगळी असल्याचे सांगितले. यानंतर विरोधक प्रबळ असणाऱ्या प्रदेशामध्ये जाळपोळ आणि निदर्शने सुरु झाली. 2007 मध्येही निवडणूक झाल्यानंतर अशाच प्रकारचा हिंसाचार झाला होता. त्या निवडणुकीच्या काळामध्ये दोन महिने हिंसाचार चालू होता. या हिंसाचारामध्ये 1100 लोकांनी प्राण गमावले होते तर सुमारे 60,000 लोक बेपत्ता झाले होते.केन्याटा कुटुंबाने केनियातील सत्ता सर्वाधीक काळ उपभोगली आहे. त्यामुळेही विरोधकांनी देशात बदल घडवण्यासाठी मतदारांना आवाहन केले आहे. उहुरु यांचे वडिल जोमो केन्याटा केनियाचे पहिले पंतप्रधान होते. 1963-64 या कालावधीत पंतप्रधान झाल्यानंतर जोमो राष्ट्राध्यक्ष झाले. 1964-1978 इतका प्रदिर्घ काळ ते पदावर राहिले. त्यांच्यानंतर त्यांच्या जवळचे मानले जाणारे डॅनियल अरॅप मोई अध्यक्ष झाले ते 1978 ते 2002 इतका मोठा काळ पदावरती होते. त्यानंतर म्वाई किबेकी हे जोमो केन्याटांच्या मंत्रिमंडळाचे सदस्य असणारे, मोई यांच्या काळात उपराष्ट्रपती असणारे 2002 ते 2013 या काळासाठी अध्यक्ष झाले, पण ते स्वतंत्र पक्षातून निवडून आले होते. त्यानंतर 2013 पासून उहुरु केन्याटा राष्ट्राध्यक्ष आहेत. उहुरु 2003 ते 2007 या कालावधीत विरोधीपक्षनेते होते, 2008 ते 2013 याकाळात त्यांच्याकडे उपपंतप्रधानपदाची जबाबदारी होती.