इस्रायलच्या संसदेत मोठा राडा झाला आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू भाषण देत असतानाच, हमासच्या हल्ल्यातील पीडितांच्या नातेवाईकांनी संसदेत शिरण्याचा प्रयत्न केला. हे लोक घोषणाबाजी करत आत शिरण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना गेटवरच रोखले. यामुळे संबंधित लोक आणखीनच भडकले आणि त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करायला सुरूवात केली.
यावेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांनीही काही लोकांवर बळाचा वापर केला आणि त्यांना ओढून अथवा धक्काबुक्की करून बाहेर काढण्यात आले. दरम्यान अनेक लोक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
एवढेच नाही तर यावेळी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू देखील काही लोकांवर ओरडताना दिसले. खरे तर, संसदेत शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांचे, तसेच हमासच्या दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या लोकांचे नातलग होते. अपहरण केलेल्यांपैकी ८ जणांची दहशतवाद्यांनी हत्या केली आहे. संबंधित लोक बेंजामिन नेतन्याहू सरकारच्या हमाससोबतच्या युद्ध बंदीच्या करारामुळे नाराज असल्याचे समजते. हमासने काही लोकांच्या नातलगांवर प्रचंड अत्याचार केले, तरीही सरकारने हमाससोबत डील केली, म्हणून काही लोक रागात आहेत.
इस्रायली सरकारला तडजोड करायची होती तर ती आधीही करता आली असती, असे काही लोकांचे म्हणणे आहे. सध्या इस्रायल आणि हमासमध्ये युद्धबंदी आहे. युद्धबंदी दरम्यान, हमासने इस्रायली बंधकांना सोडले आहे. तर इस्रायलनेही शेकडो कैद्यांना सोडले आहे. या डीलला हमासने आपला विजय असल्याचे म्हटले आहे. इस्रायल आपल्याला संपवण्याची शपथ घेत होता. मात्र, आता त्याने आमच्याशी तडजोड केली आहे. याचा अर्थ, त्यांनी आमची ताकद स्वीकारली आहे, असे हमासने म्हटले आहे.