तेहरान: अफगाणिस्तानात तालिबानच्या ताब्यानंतर परिस्थिती दिवसेंदिवस बिकट बनत आहे. तालिबानकडून इतर देशांसोबत चांगले संबंध प्रस्थापित करणार असल्याचे बोलले जात आहे, पण यातच आता तालिबानकडून इराणच्या सैनिकांवर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. अफगाणिस्तान-इराण सीमेवर इराणी सैनिक आणि तालिबानी लढवय्यांमध्ये हिंसक चकमक झाली आहे. गल्फ न्यूजच्या माहितीनुसार, या हिंसक चकमकीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, दोन्ही बाजूने अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे.
या घटनेचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये तालिबानी सैनिक शस्त्रास्त्रांसह दिसत आहेत. यावेळी हे तालिबानी सैनिक इराणी सैनिकांवर गोळीबार करताना दिसत आहेत. तालिबानला प्रत्युत्तर देताना इराणकडूनही गोळीबार करण्यात आला. इराणची वृत्तसंस्था तसनीमने हिरमंद काउंटीतील शघलक गावात ही लढत झाल्याची पुष्टी केली आहे.
इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) शी संलग्न असलेल्या तस्नीम एजन्सीने सांगितले की, तस्करी रोखण्यासाठी अफगाणिस्तानच्या सीमेजवळील इराणी प्रदेशात भिंती उभारण्यात आल्या आहेत. काही इराणी शेतकऱ्यांनी भिंती ओलांडल्या होत्या परंतु तरीही ते इराणच्या सीमेत होते. मात्र तालिबानी सैन्याला वाटले की शेतकरी आपल्या भागात आले आहेत, त्यामुळे त्यांनी गोळीबार सुरू केला.
तालिबानशी चर्चा
या प्रकरणी इराणच्या अधिकाऱ्यांनी तालिबानशी चर्चा केली, त्यानंतर हा संघर्ष संपला. बुधवारी इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सईद खतीबजादेह यांनी तालिबानचे नाव न घेता एका निवेदनात सांगितले की, सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांमधील गैरसमजांमुळे ही लढाई झाली. एका व्हिडिओमध्ये तालिबानी सैन्याला इराणच्या हद्दीत दाखविले आहे, ज्यात तालिबानी सैनिकांनी अनेक चौक्यांवर कब्जा केल्याचा दावा केला आहे. मात्र, तसनीमने हा दावा फेटाळून लावला आहे.