बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसक आंदोलन पेटलं आहे. ढाका इथं पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे आंदोलक आणि सत्ताधारी अवामी पक्षाचे समर्थक यांच्यात रविवारी झटापट झाली. या झटापटीत ३२ लोकांचा मृत्यू झाला असून शेकडो जण जखमी झाले आहेत. पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करत असहकार कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आंदोलक आले होते. अवामी लीग, छात्र लीग आणि जुबो लीगच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला आणि त्यानंतर दोन्ही गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली.
या जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या आणि स्टेन ग्रेनेडचाही वापर केला. या सर्व प्रकारामुळे बांगलादेशात पुन्हा एकदा अनिश्चित काळासाठी कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी आणि आरक्षणाबाबत सुधारणेबाबत झालेल्या आंदोलनात मृत व्यक्तींच्या वारसांना न्याय देण्याची मागणी आंदोलनकर्ते करत होते.
असहकार आंदोलनाच्या पहिल्या दिवशी राजधानीतील सायन्स लॅब चौकात लोकांनी एकत्र येत सरकारविरोधी घोषणा दिल्या. ढाका येथील सायन्स लॅब, धानमंडी, मोहम्मदपूर, टेक्निकल, मीरपूर-१०, रामपुरा, तेजगाव, फार्मगेट, पंथपथ, जत्राबारी आणि उत्तरा येथेही निदर्शने आणि रॅली काढण्यात येणार असल्याचे निदर्शनाच्या आयोजकांनी सांगितले. सरकारी नोकऱ्यांसाठी असलेली कोटा पद्धत रद्द करण्याच्या मागणीसाठी बांगलादेशातील विद्यार्थी एका महिन्याहून अधिक काळ आंदोलन केले होते. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे देशभरात हिंसा भडकली, त्यात कमीत कमी २०० लोकांचा मृत्यू झाला आहे.
आंदोलकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये प्रमुख विरोधी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने पाठिंबा दिलेल्या काही गटांचा समावेश आहे. आंदोलकांनी कर आणि बिले न भरण्याचे आणि रविवारी कामावर न जाण्याचे आवाहनही केलं. आंदोलकांनी रविवारी ढाक्याच्या शाहबाग भागातील बंगबंधू शेख मुजीब मेडिकल युनिव्हर्सिटी या रुग्णालयासह खुल्या कार्यालयांवर आणि आस्थापनांवरही हल्ले केले. ढाका येथील उत्तरा भागात काही क्रूड बॉम्बचा स्फोट झाला आणि बंदुकीच्या गोळ्या ऐकू आल्या असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. रविवारी लाठ्या-काठ्या घेऊन आंदोलकांचा जमाव ढाका शहराच्या मध्यभागी शाहबाग चौकात जमला तेव्हा पोलिस आणि आंदोलकांमध्ये जोरदार संघर्ष झाला. याशिवाय अनेक ठिकाणी आणि प्रमुख शहरांमध्ये रस्त्यावर आंदोलक आणि पोलिस कर्मचारी यांच्यात बाचाबाची झाली. आंदोलकांनी प्रमुख महामार्ग रोखून धरले होते.