जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 23 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊनमध्ये सर्वच जण आपल्या घरामध्येच राहू लागले. काही लोकांना घरी राहणं आवडलं तर काहींसाठी ते धोकादायक ठरलं. मानसिक स्थितीवर त्याचा विपरित परिणाम झाल्याच्या अनेक घटना या समोर आल्या आहेत. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. एका आठ वर्षीय मुलीवर लॉकडाऊनचा अत्यंत वाईट परिणाम झाला आहे.
कोरोना लॉकडाऊनमध्ये आलेल्या स्ट्रेसमुळे एका चिमुकलीची अवस्था भयंकर झाली आहे. तिने डोक्यावरील आणि डोळ्यांच्या पापण्यांवरील केस खेचून काढले आहेत. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या 8 वर्षीय एमेलिया (Amelia) लॉकडाऊनमध्ये प्रचंड तणावात होती. एमेलियाचे स्वतःचेच केस स्वतः खेचून काढले आहेत आणि आता तिला टक्कल पडलं आहे. तिने पापण्यावरचे केसही काढले आहेत. आता ती घरातून बाहेर पडताना डोक्याला कापड बांधते. एमेलियाची आई जेमा मँसीने (Jemma Mansie) एका वेबसाईटशी बोलताना लॉकडाऊनमध्ये एमेलिया आपल्या डोळ्यांच्या पापण्या खेचायची असं सांगितलं.
एमेलियाने हळूहळू करून पापण्यांवरील सर्व केस काढून टाकले. त्यानंतर काही दिवसांनी तिने आपल्या डोक्यावरील केस खेचून काढायला सुरुवात केली. जेमा मँसी यांनी पहिल्यांदा आपल्या मुलीला डोळ्यांच्या पापण्यांचे केस खेचताना पाहिलं आणि त्यांना धक्काच बसला. त्यावेळी तिने थोडं दुर्लक्ष केलं पण यामुळे आता तिच्या पापणीवर एकही केस नाही. दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये तिने आपल्या डोक्यावरील केस काढायला सुरुवात केली. मुलीला असं करताना पाहून तिला समजावलं पण तिने ऐकलं नसल्याचं म्हटलं आहे.
लॉकडाऊनमध्ये शाळा बंद, मित्रमैत्रिणींना भेटणं नाही त्यामुळे एमेलियावर खूप ताण आला. तिला trichotillomania ही विचित्र समस्या झाली. ज्यामुळे ती स्वतःचे केस खेचून काढून लागली असं तिच्या आईन सांगितलं आहे. एमेलिया आपले केस हळूहळू तोडत गेली आणि आता तिला पूर्ण टक्कल पडलं आहे. तिच्या डोक्यावर आता काही मोजकेच केस उरले आहेत. ती काय करत होती हे तिलाही समजत नव्हतं. त्यामुळे घरातून बाहेर पडताना ती डोक्यावर कापड गुंडाळते अशी माहिती तिच्या आईने दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.