जगभरात अत्यंत भव्यदिव्य आणि अप्रतिम हॉटेल्स आहेत. हॉटेल्सच्या वेगळेपणाची नेहमीच चर्चा होत असते. कोट्यवधी रुपये खर्च करून अनेकदा ती उभारली जातात. अनेक बारीक-सारीक गोष्टींचा विचार करून ते तयार केलं जातं. पण आता याच्या अगदी उलट एक घटना समोर आली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या एका हॉटेलमध्ये अशी एक मोठी चूक झाली की त्याचा परिसरातील हजारो नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ब्रिटनमध्ये नव्याने उभ्या राहिलेल्या एका हॉटेलच्या बांधकामात ही चूक झाली असून त्याचा शहरातील नागरिकांना फटका बसतो आहे.
ब्रिटनमधील मिल्टन कीन्स शहरात 'ला टूर' नावाचं एक शानदार हॉटेल उभारण्यात आलं आहे. तब्बल 261 खोल्या असलेलं 14 मजली हे हॉटेल तयार करण्यासाठी 300 कोटींहून अधिक खर्च करण्यात आला आहे. हे हॉटेल उभं करताना त्याला बाहेरच्या बाजूला ज्या काचा लावण्यात आल्या आहेत, त्यातून आता सूर्याचे किरण परावर्तीत होऊन नागरिकांना त्रास होत आहे. या मोठ्या इमारतीवरून सूर्याचे किरण परावर्तीत होत असल्यामुळे रस्त्याने येणाऱ्या आणि जाणाऱ्या नागरिकांच्या डोळांना त्रास होत आहे. तसेच यामुळेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
इमारतीवरून येणारी किरणं ही प्रखऱ आणि थेट डोळ्यात जाणारी
सूर्यापेक्षाही या इमारतीवरून येणारी किरणं ही प्रखऱ आणि थेट डोळ्यात जाणारी असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. वाहन चालवताना अचानक या इमारतीवरून येणारी किरणं डोळ्यात जातात आणि अक्षरशः डोळ्यांसमोर अंधारी येत असल्याचे अनुभव नागरिकांनी व्यक्त केले आहेत. इमारत बांधताना या गोष्टीचा विचार इंजिनिअरने कसा काय केला नाही, याबाबत नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी हॉटेलनं समस्येवर तोडगा काढणार असल्याचं जाहीर केलं आहे.
तक्रारी लक्षात घेऊन आणि आवश्यक ते बदल करणार
काचा बदलून किंवा काचांसमोर आणखी एखादा घटक लावून त्यातून किरण परावर्तीत होणार नाहीत, याची काळजी घेण्यात येईल, असं हॉटेल प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. हॉटेलच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, ते लोकांच्या तक्रारी लक्षात घेऊन आणि आवश्यक ते बदल करतील. बरेच नियोजन केल्यानंतर आणि लोकांशी बोलल्यानंतर, इमारतीला स्टेनलेस स्टीलसारखा लूक देण्यासाठी आम्ही काचेचा वापर केला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.