पाकिस्तानचे (Pakistan) अर्थमंत्री इशाक डार (Ishaq Dar) अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील ड्युलेस आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले असता त्यांना अज्ञात लोकांनी शिवीगाळ केल्याची घटना घडली. पूरग्रस्त देश पाकिस्तानसाठी जागतिक कर्ज देणाऱ्या संस्थांकडून आर्थिक मदत घेण्यासाठी ते आले होते. ट्विटरवर यासंदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत विमानतळावर डार यांना काही लोक ‘खोटारडा’ आणि ‘चोर’ म्हणताना ऐकू येत आहे. त्यांच्यासोबत अमेरिकेतील पाकिस्तानचे राजदूत मसूद खान आणि अन्य अधिकारीही उपस्थित होते.
व्हिडीओमध्ये अज्ञात लोकांकडून त्यांना चोर चोर असे म्हटल्याचेही ऐकू येत आहे. “तुम्ही खोटारडे आहात, चोर आहात,” असं एक व्यक्ती म्हणत असल्याचं येत आहे. यावर डार यांनीदेखील प्रत्युत्तर देत तुम्ही खोडाटरडे आहात असं म्हटलं. डार यांच्यासोबत उपस्थित पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज पक्षाच्या व्हर्जिनिआचे प्रमुख मणी बट यांनी अज्ञातांशी वाद घातल्याचं व्हिडीओमध्ये ऐकू येत आहे. यामध्ये दोन्ही बाजूंनी अपशब्दांचा वापर करण्यात आल्याचं पाकिस्तानी वृत्तपत्र द डॉननं म्हटलंय.