S Jaishankar meets Chinese Foreign Minister: जर्मनीतील म्युनिक येथे ६०वी सुरक्षा परिषद सुरू आहे. परिषदेत अनेक देशांचे नेते सहभागी होत आहेत. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जशंकरही जर्मनीला पोहोचले आहेत. परिषदेदरम्यान जयशंकर यांना पाहून चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी स्वत: त्यांच्याशी संपर्क साधला. दोन्ही नेत्यांनी परिषदेच्या विषयांव्यतिरिक्त काही मिनिटे स्वतंत्रपणे भेट घेतली. या दोन नेत्यांच्या छोट्याशा भेटीची मोठी चर्चा सुरू आहे.
व्हिडिओ फुटेज व्हायरल-
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची जर्मनीतील म्युनिक सुरक्षा परिषदेच्या निमित्ताने भेट झाली. म्युनिक सिक्युरिटी कॉन्फरन्सच्या व्हिडीओ फुटेजमध्ये जयशंकर आणि वांग कार्यक्रमाच्या बाजूला काही वेळ बोलताना दिसत आहेत. या परिषदेत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन आणि जगभरातील इतर उच्च राजनैतिक अधिकारी सहभागी झाले आहेत. मात्र, दोन्ही परराष्ट्र मंत्र्यांमधील चर्चेबाबत भारत आणि चीनकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. सहा महिन्यांहून अधिक काळातील दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच भेट होती.
भारत-चीन राजकीय संबंधांमधील तणावाचे काय?
जुलैमध्ये इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे झालेल्या असोसिएशन ऑफ साउथईस्ट एशियन नेशन्स (ASEAN) च्या बैठकीत दोघांची शेवटची भेट झाली होती. मे 2020 पासून पूर्व लडाखमध्ये भारतीय आणि चिनी सैन्याच्या सैनिकांमध्ये संघर्ष झाला तेव्हापासून भारत-चीन यांच्यातील राजकीय संबंध तणावाचे आहेत. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चेच्या २० फेऱ्या झाल्या आहेत. तसेच चार टप्प्यांवर सैन्य मागे घेण्याचे मान्य करण्यात आले आहे.