ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील सीमारेषेवर जितका तणाव वाढत आहे, तितकाच रोष सामान्य लोकांमध्ये पाहायला मिळत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक आपला रोष व्यक्त करत आपलं मत मांडताना दिसत आहे. अशामध्येच सोशल मीडियावर एका पाकिस्तानी महिला खासदाराचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये महिला खासदार संसदेत मला पाकिस्तान असल्याची लाज वाटत असल्याचं ओरडून सांगत आहे. हा व्हीडिओ व्हाट्सअॅप, फेसबूकवर अनेक ठिकाणी शेअर होत आहे.
व्हीडिओमध्ये दिसणा-या महिला खासदाराचं नाव फौजिया एजाज खान असं आहे. तीन मिनिटांच्या या व्हीडिओमध्ये फौजिया खान अत्यंत भावनिक झालेल्या दिसतात. 'गेल्या 60 वर्षापासून आपण फक्त द्वेष पसरवत आहोत. द्वेषाने आपल्या देशाला काय दिलं आहे. तेल, पाणी, वीज काय दिलं ? का द्वेषाबद्दल बोलत आहात. मला पाकिस्तानी असल्याची लाज वाटते', असं फौजिया खान बोलल्या आहेत.
पाकिस्तानी खासदारानेच आपल्या देशाचा काढलेले वाभाडे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. पाकिस्तान आपल्या लोकांचं का ऐकत नाही असा सवालही या व्हीडिओच्या निमित्ताने विचारला जात आहे. हा व्हीडिओ तसा जूना आहे मात्र सध्या भारत - पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभुमीवर व्हीडिओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. हिजबूल कमांडरचा दहशतवादी बुरहान वानीच्या मृत्यूनंतरही हा व्हीडिओ व्हायरल झाला होता.