काबूल : परराष्ट्र सचिव सुजाता सिंह यांनी शुक्रवारी अफगाणिस्तानच्या हेरात प्रांताचा दौरा केला. गेल्या आठवड्यात भारतीय वाणिज्य दूतावासावर झालेल्या भीषण हल्ल्यानंतर येथील सुरक्षा स्थितीचा त्यांनी आढावा घेतला. हेरातचे गर्व्हनर सय्यद फजुल्ला वहिदी, अफगाणिस्तानातील भारतीय राजदूत अमर सिन्हा आणि अन्य वरिष्ठ अधिकारी यांच्याशी त्यांनी या दौर्यात चर्चा केली. काही तासांच्या या दौर्यात सुजाता सिंह यांनी सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला. अधिकार्यांनी सांगितले की, भारतीय-तिबेट सीमा पोलीस अर्थात आयटीबीपीच्या सुरक्षा कर्मचार्यांसह २३ मे रोजीच्या हल्ल्यात प्राणाची बाजी लावून दहशतवाद्यांचा मुकाबला केलेल्या ‘त्या’ सर्व धाडसी कर्मचार्यांशी परराष्ट्र सचिवांनी बातचीत केली. या हल्ल्यात सहभागी सर्व चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. अफगाण राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांनी यापूर्वीच सांगितले की, एका पाश्चात्त्य गुप्तचर संस्थेद्वारा मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्यातील गुन्हेगार हे लष्कर ए- तोयबाशी संबंधित आहेत. अफगाणच्या वायव्येकडे असलेला हेरात राजधानी काबूलपासून ८०० किलोमीटर अंतरावर आहे. (वृत्तसंस्था)
परराष्ट्र सचिवांची हेरातच्या वाणिज्य दूतावासाला भेट
By admin | Published: May 31, 2014 6:13 AM