मॉस्को- 12 जून रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे शासक किम जोंग उन यांची सिंगापूर येथे भेट होणार आहे. मागिल महिन्यात किम जोंग उन आणि दक्षिण कोरियाचे मून जाए इन यांची भेट झाल्यानंतर कोरियन द्वीपकल्प अण्वस्त्रमुक्त करण्यावर दोन्ही देशांच्या नेत्यांचे एकमत झाले होते. त्यानंतर कोरियांसदर्भातील विविध घडामोडींना वेग आला आहे.उत्तर कोरियाला अमेरिकन शिष्टमंडळाने भेट दिली तर सिंगापूरलाही दोन्ही देशांच्या उच्चपदस्थ अधिकारी व नेत्यांनी भेट दिली आहे. आता उद्या रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जे लॅव्रोव जाणार आहेत. सर्जे कोरियन नेत्यांशी अणूकार्यक्रम आणि इतर व्दीपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करतील असे रशियन परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे.गेल्या महिन्यात उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्री री योंग हो यांनी मॉस्को येथे जाऊन सर्जे लॅव्रोव यांची भेट घेतली होती. आता सर्जे उत्तर कोरियाला जात असल्यामुळे उत्तर कोरियातील अणुकार्यक्रमामुळे तयार झालेला तणाव कमी करण्यासाठी मदत होईल असे सांगण्यात येत आहे.अमेरिकेने सध्या उत्तर कोरियावर आर्थिक बंधने लादली आहेत. ही बंधने मागे घेण्यासाठी उत्तर कोरियाने लवकरात लवकर आपली अण्वस्त्रे नष्ट करावीत असे अमेरिकेचे मत आहे.
गेल्या आठवड्यात उत्तर कोरियातील अणू चाचणी केंद्राला काही परदेशी पत्रकार भेट देण्यासाठी गेले होते. अणू कार्यक्रम हळूहळू थांबवत असल्याच्या उत्तर कोरियाच्या घोषणेनंतर तेथिल सध्यस्थिती पाहाण्यासाठी हे पत्रकार पोहोचले होते. मात्र अमेरिकन लष्कराबरोबर सराव केल्यामुळे दक्षिण कोरियन पत्रकारांना तेथे जाण्याची परवानगी नाकारण्यात आली. उत्तर कोरियन सरकारने मर्य़ादित स्वरुपात या अणुचाचणी स्थळाला भेट देण्याची परवानगी दिली. भूमिगत चाचण्या आणि इंटरकॉन्टीनेन्टल बॅलिस्टीक मिसाइलच्या चाचण्या थांबवू असे आश्वासन उ. कोरियाने दिले होते. द. कोरियाने अमेरिकन लष्कराबरोबर युद्धसराव केल्यामुळे उत्तर कोरियाने नुकतेच प्रस्थापित झालेले उच्चस्तरिय संबंध गोठवले. त्यामुळे या पत्रकारांच्या चमूमध्ये द. कोरियन पत्रकारांचा समावेश नाकारण्यात आला होताय उ. कोरियात आलेल्या पत्रकार बीजिंगमधून एका चार्टर्ड विमानातून आले. त्यामध्ये अमेरिका, इंग्लंड आणि चीन, रशिया या देशांतील पत्रकारांमध्ये समावेश होता.