लोकमत न्यूज नेटवर्कहैफा : आपल्या ऐतिहासिक दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी, अखेरच्या दिवशी इस्रायलसाठी बलिदान देणाऱ्या भारतीय सैनिकांच्या स्मृतिस्थळी भेट दिली. पहिल्या महायुद्धादरम्यान भारतीय सैनिकांनी दिलेले हे बलिदान म्हणजे भारत-इस्रायलमधील अतूट बंधनाच्या इतिहासाची साक्ष असल्याचे गौरवोद्गार मोदी यांनी या वेळी काढले. हैफा या इस्रायलमधील प्राचीन शहरातील भारतीय सैनिकांच्या स्मृतिस्थळाला आणि स्मशानालाही मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी भेट दिली. मोदी म्हणाले की, हैफाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या ४४ भारतीय सैनिकांचे स्मृतिस्थळ आहे. १९१८ साली इस्रायलमध्ये बलिदान देणाऱ्या या जवानांच्या स्मृतीसाठी भारतीय लष्कर आजही २३ सप्टेंबर रोजी हैफा दिवस पाळते. जोधपूर आणि म्हैसूर आणि संस्थानांतील जवान असलेल्या ब्रिटिश लष्कराच्या १५व्या घोडदळाने २३ सप्टेंबर १९१८ रोजी तुर्की आॅटोमन आणि जर्मन फौजांवर आक्रमक हल्ला केला. आॅटोमन सैन्याकडे त्या वेळेस उत्तम मशिनगन्स होत्या. मात्र तलवारी, घोडेस्वारीच्या मदतीने भारतीय जवानांनी हैफाची आॅटोमन्सच्या तावडीतून मुक्तता केली. या युद्धातील मेजर दलपत सिंह यांना ‘हीरो आॅफ हैफा’ म्हणून संबोधले जाते. तीनमूर्ती मार्ग, तीनमूर्ती चौकाचे हैफा हे नामांतर प्रलंबितचपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी हैफा शहराला भेट देऊन भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहिली. परंतु दिल्लीतील तीनमूर्ती मार्ग आणि तीनमूर्ती चौकाचे नामांतर इस्रायलमधील हैफा शहराच्या नावाने करण्याचा दोन महिन्यांपूर्वीचा प्रस्ताव मात्र पुढे सरकायला तयार नाही. नवी दिल्ली महापालिकेने एप्रिलमध्ये हा मार्ग व चौक यांचे हैफा असे नामांतर करण्याचा प्रस्ताव मांडला होता. मोदी यांचा पहिलाच इस्रायल दौरा समोर ठेवून हा प्रस्ताव होता. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. बैठकीत काही सदस्यांनी तो प्रस्ताव संमत झाल्याचा दावा केला. परंतु परिषदेचे अध्यक्ष नरेश कुमार यांनी काही तासांनी तो प्रस्ताव लांबणीवर टाकला गेल्याचे जाहीर केले. त्यानंतर तो प्रस्ताव पुन्हा विचारासाठी आला नाही.
भारतीय सैनिकांच्या स्मृतिस्थळाला भेट
By admin | Published: July 07, 2017 1:50 AM