फोर्ट मेयर : भारतीय अमेरिकन विवेक मूर्ती (३७) हे अमेरिकेचे सर्जन जनरल बनले असून, उपाध्यक्ष जो बायडन यांच्या उपस्थितीत कार्यक्रमात विवेक मूर्ती यांचा शपथविधी झाला. अमेरिकेतील सार्वजनिक आरोग्याचे इन्चार्ज असणारे विवेक मूर्ती या पदावर असणारे सर्वात तरुण अधिकारी ठरले आहेत. फोर्ट मायर येथील लष्करी तळावर झालेल्या या समारंभात मूर्ती यांनी पदाची शपथ भगवद्गीतेवर हात ठेवून घेतली. ओबामा प्रशासनातील ते सर्वात उच्च पदावरील भारतीय अधिकारी ठरले आहेत. सर्जन जनरल पदावर सेवा करण्याची संधी मिळणे हा फार मोठा सन्मान आहे, तसेच ही एक मोठी जबाबदारीही आहे, असे विवेक मूर्ती शपथविधी प्रसंगी बोलताना म्हणाले. मूर्ती हे अमेरिकेचे १९ वे सर्जन जनरल आहेत. सर्जन जनरल या नात्याने विवेक मूर्ती यांचा दर्जा व्हाईस अॅडमिरलप्रमाणे असेल. आरोग्यमंत्री सिल्व्हीया बरवेल या समारंभास उपस्थित होत्या. विवेक मूर्ती या पदास पात्र आहेत, असे उपाध्यक्ष जो बायडन याप्रसंगी बोलताना म्हणाले. विवेक मूर्ती यांना कुटुंबाचा पाठिंबा आहे, असा उल्लेख त्यांनी आवर्जून केला.
विवेक मूर्ती अमेरिकेच्या महाशल्यचिकित्सकपदी
By admin | Published: April 23, 2015 11:30 PM