म्यानमार, दि. 6 - जागतिक मंचावरचे आशियाई देशांचे वाढते महत्त्व लक्षात घेता जगाच्या भल्यासाठी आशियाई देशांनी आपल्याकडे असलेल्या वैचारिक मूल्ये व पर्यावरणीय संस्कृतीच्या संपदेचा सुयोग्य वापर करावा, असं उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक म्हणाले आहेत. राम नाईक यांनी म्यानमारची राजधानी यंगून येथे संवाद या आंतरराष्ट्रीय संमेलनाचे उद्घाटन केले. त्यावेळी ते बोलत होते.दिल्लीतल्या विवेकानंद इंटरनॅशनल अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज व जपान फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यंगून येथे भरलेल्या दोन दिवसीय संमेलनात संघर्ष परिस्थिती टाळा व पर्यावरणीय चेतना या विषयावर भारत, म्यानमार, जपानसहीत अनेक देशांचे नेते, विद्वान व धर्मप्रसारक आपले विचार मांडणार आहे. गौतम बुद्धांनी स्वतःच स्वतःला मार्ग दाखवा असे म्हटले होते. उपनिषदांमध्येही तत्त्व व आत्मा हे सर्वोच्च चेतनेहून भिन्न असल्याचं प्रतिपादनही राम नाईक यांनी केले.राम नाईक म्हणाले, प्राचीन काळापासून म्यानमार व भारताचे सौहार्दाचे संबंध आहेत. ते अधिकाधिक दृढ करण्यासाठी दोन्ही देशांनी केलेल्या प्रयत्नांना आज यश आलंय. समाजाच्या विकासासाठी या दोन्ही देशांना आपापल्या सांस्कृतिक परंपरेचे अधिष्ठान कामी येणार आहे. आज सारे जग पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी प्राचीन परंपरांचाही उपयोग होतोय. वसुधैव कुटुंबकम ही विचारधारासुद्धा प्राचीन वैचारिक धन आहे. आज जागतिक पातळीवरही विचारांची गरज आहे. राम नाईक यांनी यावेळी प्राचीन परंपरांचं महत्त्व विषद केलं आहे. या संमेलनात जपानचे पंतप्रधान आणि भारताचे पंतप्रधान यांचे व्हिडीओ संदेश दाखवण्यात आले आहेत. व्हिएतनाम उपपंतप्रधान, म्यानमारचे सांस्कृतिक मंत्री आदी नेत्यांप्रमाणेच जपान, चीन, कंबोडिया, नेपाळ, श्रीलंका, मंगोलिया, थायलंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आदी देशांतील मान्यवर सहभागी झाले होते. तत्पूर्वी 3 व 4 सप्टेंबर 2015 रोजी नवी दिल्लीत आयोजित केलेल्या संवाद या कार्यक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलं होतं.
आशियाई देशांनी जगाचे नेतृत्व करण्यासाठी आध्यात्मिक परंपरेचे निजधन वापरावे- राम नाईक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2017 10:29 AM