युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यानच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या 1000 पर्सनल कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. त्यांच्या जागी आता नव्या लोकांची भरती करण्यात आली आहे. रशियन मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पुतिन यांना अन्नातून विष देऊन हत्या होऊ शकते, अशी शंका आहे. तसेच, गुप्तचर संस्थांच्या इनपुटनंतर पुतिन अत्यंत भयभीत झाले आहेत.
यापूर्वीच, रशियन टीव्हीवर बोलताना व्लादिमीर पुतिन म्हणाले होते की, युक्रेनविरुद्ध युद्ध सुरू झाल्यानंतर रशियातही त्यांच्या विरोधात विशेष मोहीम सुरू केले जाऊ शकते. काही देशद्रोही लोक त्यांच्या विरोधात हत्येचा कटही रचू शकतात.
डेली बिस्टचे संपादक क्रेग कोपेटस यांनी म्हटल्याप्रमाणे, त्यांना सांगण्यात आले आहे की, पुतिन यांना अन्नातून विष देऊन मारण्याची शक्यता आहे. ते म्हणाले, रशियात विष देऊन मारणे, ही हत्येची सर्वसामान्य पद्धत आहे. तसेच, पुतीन कुठलेही अन्न घेण्यापूर्वी त्याची तपासणी केली जाते. मात्र, असे असले, तरीही पुतिन यांनी आपल्या पर्सनल स्टाफमधील 1000 कर्मचारी पूर्णपणे बदलले आहेत. नौकरीवरून काढलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षा रक्षक, स्वयंपाकी आणि खाजगी सचिवांचाही समावेश आहे.
रशियानं युक्रेनवर डागली हायपरसोनिक मिसाईल -युक्रेन गेल्या 24 दिवसांपासून रशियन फौजांचे हल्ले झेलत आहे. यातच आज रशियाने युक्रेनवर हायपरसोनिक मिसाईल डागल्याने खळबळ उडाली आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांचा संयम आता सुटत चालला असून पुढे ते अणुबॉम्बही टाकायला मागे-पुढे पाहणार नाहीत, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
रशियाने खुद्द हायपरसोनिक मिसाइल डागल्याचा दावा केला आहे. किंझल हायपरसोनिक मिसाईल वापरून आम्ही युक्रेनच्या मिसाईल आणि विमानांच्या शस्त्रांचे मोठे भांडार उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे. हा हल्ला रशियाचा पाचवा जनरल युक्रेनमध्ये मारला गेल्यानंतर करण्यात आला आहे. यामुळे अमेरिकेने रशिया अण्वस्त्रांचा वापर करणार असल्याचा इशारा दिला आहे.