PM मोदींना घाबरवले अथवा धमकावले जाऊ शकत नाही, राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी पुन्हा केली प्रशंसा!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 02:56 AM2023-12-08T02:56:44+5:302023-12-08T02:58:10+5:30
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोंड भरून प्रशंसा केली आहे...
भारत आणि रशिया यांच्यात अनेक दशकांपासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत. दोन्ही देशांनी एकमेकांना अनेक वेळा मदतीचा हातही दिला आहे. आता रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोंड भरून प्रशंसा केली आहे. मोदींना घाबरवले अथवा धमकावले जाऊ शकत नाही, असे पुतिन यांनी म्हटले आहे.
युक्रेनमध्ये युद्ध सुरू असतानाही भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्याचा उल्लेख करत पुतीन म्हणाले, मी सर्वप्रथम सांगू इच्छितो की, रशिया आणि भारत यांच्यातील संबंध सर्वच क्षेत्रांत सातत्याने विकसित होत आहेत. याचे कारण म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण, असे पुतिन यांनी म्हटले आहे. ते सेंट पीटर्सबर्ग येथे 'रशिया कॉलिंग इन्व्हेस्टमेंट फोरम' मध्ये बोलत होते.
पुतिन म्हणाले, मी कल्पनाही करू शकत नाही की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतीय हीत आणि भारतीय जनतेच्या विरोधात कुठलीही कारवाई करण्यासाठी अथवा निर्णय घेण्यासाठी घाबरवले, धमकावले अथवा भाग पाडले जाऊ शकते. मला माहीत आहे, त्यांच्यावर असा दबाव आहे. खरे तर, मी त्यांच्यासोबत यासंदर्भात कधीही बोलत नाही. केवळ बाहेरून बघत असतो, काय सुरू आहे ते. कधी कधी तर भारतीय लोकांच्या सुरक्षिततेसंदर्भातील त्यांच्या कठोर भूमिकेचे मला आश्चर्यही वाटते.
🇷🇺 राष्ट्रपति व्लादिमीर पुतिन ने की 🇮🇳 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की तारीफ, कहा- उनकी नीति भारत और रूस के प्रगाढ़ संबंधों की गारंटी
— RT Hindi (@RT_hindi_) December 7, 2023
राष्ट्रपति पुतिन ने कहा- ''रूस और भारत के संबंध लगातार सभी दिशाओं में विकसित हो रहे हैं और इसकी मुख्य गारंटी प्रधानमंत्री मोदी की नीति है। मैं… pic.twitter.com/b7lwMuMWZD
महत्वाचे म्हणजे, रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून युद्ध सुरू आहे. हे युद्ध सुरू झाल्यानंतर, अमेरिकेसह पश्चिमेकडील देशांनी रशियावर कठोर निर्बंधही लादले होते. मात्र असे असतानाही, भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल खरेदी केले आहे.