रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या प्रकृतीबाबत गेल्या काही दिवसांपासून अनेक दावे केले जात आहेत. मात्र आतापर्यंत पुतिन यांच्या आरोग्याच्या दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य दिसून आलेले नाही. आता ब्रिटनचे माजी गुप्तहेर ख्रिस्तोफर स्टील यांनी पुतिन यांच्याबद्दल धक्कादायक दावा केला आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे गंभीर आजारी असल्याचा दावा ख्रिस्तोफर स्टील यांनी केला आहे. दरम्यान, ख्रिस्तोफर स्टील यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एक डोजियर लिहिले होते आणि 2016 च्या अमेरिका निवडणूक प्रचारात रशियाच्या हस्तक्षेपाचा आरोप केला होता. आता स्काय न्यूजशी बोलताना त्यांनी म्हटले आहे की, आम्ही रशिया आणि इतरत्र स्त्रोतांकडून ऐकत आहोत की, व्लादिमीर पुतिन निश्चितपणे गंभीर आजारी आहेत.
लीक ऑडिओ टेपमधून खुलासादरम्यान, लीक झालेल्या ऑडिओ टेपच्या चर्चेलाही वेग आला आहे. ज्यामध्ये व्लादिमीर पुतिन यांच्याशी जवळचे संबंध असलेल्या एका व्यक्तीनेही ते ब्लड कॅन्सरने ग्रस्त असल्याचे सांगितले आहे. हा व्यक्ती पाश्चात्य भांडवलदारांसोबत व्लादिमीर पुतिन यांच्या तब्येतीविषयी चर्चा करताना ऐकला होता. हे लीक झालेले ऑडिओ रेकॉर्डिंग न्यू लाईन्स या अमेरिकन मासिकाच्या हाती लागले आहे. याचबरोबर, लीक झालेल्या ऑडिओ टेप्सचा हवाला देत व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर आक्रमण करण्याचा आदेश देण्यापूर्वी काही वेळापूर्वी त्यांच्या पाठीवर ब्लड कॅन्सरशी संबंधित शस्त्रक्रिया केली होती. तसेच, व्लादिमीर पुतिन हे वेडे झाले आहेत, असेही त्यात म्हटले आहे.
तब्येतीबाबत अनेक तर्क-वितर्क युक्रेन युद्धानंतर व्लादिमीर पुतिन यांच्या बिघडत चाललेल्या तब्येतीविषयी अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. तसेच, व्लादिमीर पुतिन हे मागील आठवड्यात विजय दिनाच्या उत्सवासह सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये पूर्वीपेक्षा थोडे कमकुवत दिसून आले होते. याशिवाय, या महिन्याच्या सुरुवातीला मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, व्लादिमीर पुतिन यांच्यावर कर्करोगाची शस्त्रक्रिया होऊ शकते आणि सुरक्षा परिषदेचे प्रमुख आणि माजी फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस (एफएसबी) कमांडर निकोलाई पेत्रुशेव्ह यांच्याकडे तात्पुरते अधिकार सोपवले जाऊ शकतात.