खेरसानमधील पराभव रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यासाठी अडचणीचा ठरत आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण खेरसानच्या पराभवानंतर, रशियामध्ये टेलिग्रामवर एक अत्यंत खतरनाक मेसेज व्हायरल झाला होता. या मेसेजमध्ये पुतिन यांना सत्तेवरून हटविण्या बरोबरच, त्यांना मारण्यासंदर्भातही भाष्य करण्यात आले होते. हा मेसेज नंतर काढण्यातही आला. मात्र, यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. रशियामध्ये राष्ट्रपती पुतिन यांच्या विरोधात संतापाची लाट तयार होत आहे का? असा प्रश्नही यानिमित्ताने उभा राहत आहे.
शेअर करण्यात आली अशी स्टोरी - हा मेसेज अलेक्झांडर डुगिन नावाच्या एका व्यक्तीने टेलिग्रामवर केला आहे. द मिररच्या रिपोर्टनुसार, त्यांनी या मेसेजमध्ये जेम्स फ्रेजरच्या गोल्डन बो या कथेचा हवाला दिला आहे. या कथेत, राजाला केवळ दुष्काळात पाऊस पाडता न आल्याने मारले जाते. संबंधित वृत्तानुसार, डुगिनने लिहिले आहे, की आपण एखाद्या शासकाला शक्ती देतो, ही शक्ती लोकांना आणि राज्याचे कठीण प्रसंगी संरक्षण करण्यासाठी दिली जाते. मात्र, तो तसे करण्यास असमर्थ असेल, तर हे अत्यंत दुःखद आहे.
मेसेजमध्ये नागरिकांना भडकावले -यानंतर, अलेक्झांडर डुगिन यांनी युक्रेनमधील रशियन सैन्याच्या परिस्थितीसंदर्भात भाष्य केले. त्यांनी लिहिले, स्वत:ला खरा रशियन म्हणवून घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दुःख वाटायला हवे. खेरसनमधील रशियन सैन्याच्या परिस्थितीबद्दल एखाद्या व्यक्तीला दुःख होत नसेल, तरी ती व्यक्ती खर्या अर्थाने रशियन नाहीच. एवढेच नाही, तर खेरसानच्या मुद्द्यावरून राष्ट्रपती पुतिन आणि रशियन लष्करी अधिकाऱ्यांमध्येही मतभेद असल्याचे समोर येत आहे.