रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आले आहेत. पुतिन यांनी पत्रकार परिषद घेतली, विशेष म्हणजे ही पत्रकार परिषद चार तास चालली. या पत्रकार परिषदेमध्ये पुतिन यांनी अनेक विषयांवर भाष्य केल्याचे पहायला मिळाले. सरकारी वृत्तवाहिनीवरुन पत्रकार परिषदेचे लाइव्ह टेलिकास्ट करण्यात आले होते.
या पत्रकार परिषदेदरम्यान पुतिन यांनी पत्रकारांच्या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली. पुतीन यांनी तब्बल चार तास पत्रकार परिषद घेतल्यानंतर जगातील अनेक देशांमधून त्यांचे कौतुक केले जात आहे. पुतिन यांनी पत्रकार परिषदेमध्ये युक्रेनवरुन पाश्चिमात्य देशांना थेट इशारा दिला. नाटोचा विस्तार युक्रेनपर्यंत करुन सुरक्षेची हमी देण्याची आपली मागणी पूर्ण केली जात नसेल तर आपण वेगळ्या मार्गांचा विचार करु असं पुतिन म्हणाले.
पुतिन यांच्या पत्रकार परिषदेसंदर्भात अनेक पत्रकारांनी ट्विटरवरुन पोस्ट केले आहे. करोना नियमांमुळे पुतिन हे पत्रकारांपासून काही अंतरावर बसले होते. मात्र त्यांना विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची त्यांनी सविस्तर उत्तरे दिल्याचे पहायला मिळाले. पुतिन यांच्या या पत्रकार परिषदेनंतर इतर लोकशाही देशांमधील नागरिकांनी आमच्या नेत्यांनी अशी हिंमत दाखवणे गरजेचे असल्याचे मत सोशल मीडियावरुन व्यक्त केले आहे.