पुतीन यांची प्रायव्हेट आर्मी त्यांच्यावरच उलटली! रशियाच्या रोस्तोव शहरावर कब्जा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 10:56 AM2023-06-24T10:56:32+5:302023-06-24T10:57:02+5:30
रशियाच्या पावलोव्हस्क जिल्ह्यात रशियन सैन्य आणि वॅगनर गटाच्या लढवय्यांमध्ये चकमक सुरु झाली आहे.
युक्रेन युद्धात रशियाला यश येत नसतानाच राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची प्रायव्हेट आर्मीच त्यांच्या मुळावर उलटली आहे. वॅगनआर ग्रुपने रशियावरच हल्ला करण्याची घोषणा केली असून एका शहरावर ताबाही मिळविला आहे. यामुळे रशियात खळबळ उडाली आहे. मॉस्कोच्या शहरांचा ताबा रशियन लष्कराने घेतला आहे.
पुतिन यांना थेट धमकी देणारा 'येवगेनी प्रिगोझिन' आहे कोण?; पहिला विकायचा हॉट डॉग
रशियाच्या पावलोव्हस्क जिल्ह्यात रशियन सैन्य आणि वॅगनर गटाच्या लढवय्यांमध्ये चकमक सुरु झाली आहे. येवगेनी प्रीगोझिन याने रशियाच्या लोकांसाठी मरण्यासाठी माझे २५ हजार सैनिक तयार असल्याची घोषणा केली आहे. येवगेनी प्रीगोझिन हा पुतीन यांचा म्होरक्या होता. युक्रेनमधील बाखमुट येथील वॅगनर प्रशिक्षण शिबिरावर क्षेपणास्त्र हल्ला झाला होता. यामुळे या संघटनेचा प्रमुख येवगेनी प्रीगोझिन संतापला आहे. त्याने यासाठी क्रेमलिनला जबाबदार मानले आहे. यासाठी रशियाला शिक्षा आणि सूड उगवण्याची शपथही त्यांनी घेतली आहे. वॅगनरचे डझनभर सैनिक मारले गेले आहेत. आम्ही मॉस्कोकडे कूच करत आहोत. जो कोणी आमच्या केंद्रात प्रवेश करेल तो यासाठी जबाबदार असेल, असे त्याने म्हटले आहे.
वॅगनआर ग्रुपचे सैनिक रशियन शहरात रोस्तोव्हमध्ये दाखल झाले आहेत. रोस्तोव शहरातील रस्त्यांवर टँक आणि सशस्त्र सैनिक दिसत आहेत. त्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. रशियाच्या संरक्षण मंत्र्यांच्या आदेशानुसार रशियन लढाऊ विमानांनी त्यांच्या वॅगनर ग्रुपच्या सैनिकांवर बॉम्बफेक केल्याचा आरोप प्रीगोझिन याने केला आहे.
Wagner forces have made it to the Southern Military District Headquarters in Rostov. pic.twitter.com/BVKmfuWWEm
— OSINTtechnical (@Osinttechnical) June 24, 2023
वॅगनर गटाच्या सैनिकांनी नोव्होचेरकास्कच्या मार्गावरील पहिली चौकी आधीच ओलांडली आहे. रशियन सैन्याचे मुख्यालय नोवोचेरकास्क येथे आहे. त्यानंतर मॉस्कोच्या रस्त्यावर चिलखती वाहनांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. अमेरिकाही या घटनेवर बारीक लक्ष ठेवून आहे. रशियन स्पेशल फोर्सने मॉस्कोभोवती नाकाबंदी केली असल्याचे सांगण्यात येत आहे.