जकार्ता : इंडोनशियातील दाट लोकवस्तीच्या जावा बेटावर असलेल्या मेरापी या अठरा हजार फुट उंच पर्वत शिखरावरील ज्वालामुखीचा शुक्रवारी उद्रेक झाल्यानंतर त्याच्या मुखातून लाव्हारस व राख यांचे कारंजे हवेत उसळले. यामुळे लोकांमध्ये प्रचंड घबराट पसरली असून, त्यांच्या स्थलांतराचे काम हाती घेण्यात आले आहे. या पर्वतशिखराच्या नजीकच्या परिसरात राहात असलेल्या शेकडो लोकांना घरे रिकामी करून तत्काळ सुरक्षित स्थळी जाण्यास सांगण्यात आले आहे. इथून जवळच असलेला योग्याकार्ता विमानतळ वाहतुकीसाठी तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. तो कधी सुरू होईल, हे आताच सांगणे शक्य नाही, असे सरकारतर्फे सांगण्यात आले.मेरापी पर्वतशिखरावरील ज्वालामुखी हा इंडोनेशियातील अतिशय जागृत ज्वालामुखींपैकी एक आहे. या ज्वालामुखीचा २०१० साली अनेकदा उद्रेक झाला होता आणि ३५० जण मरण पावले होते. मेरापीपासून ५ किमी.च्या परिसरात राहाणारे नागरिक सुरक्षितस्थळी रवाना होत असल्याचे इंडोनेशियाच्या आपत्कालीन स्थलांतर यंत्रणेच्या प्रवक्त्याने सांगितले.गिर्यारोहक सुरक्षित : ज्वालामुखीची राख योग्याकार्ता विमानतळ परिसरात पडण्याचा धोका असल्याने तो तात्पुरता बंद ठेवला आहे. गिरीभ्रमणासाठी गेलेले १२० जण सुरक्षित आहेत.
इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक; विमानतळ बंद; लोकांचे स्थलांतर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 3:25 AM