Volodymyr Zelensky on PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शुक्रवारी(दि.23) राजधानी कीव येथे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पीएम मोदींनी रशिया-युक्रेन युद्धातबाबत भारताची भूमिका मांडली. दरम्यान, या भेटीनंतर आता झेलेन्स्की यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मीडियाशी बोलताना त्यांनी भारताला तटस्थ भूमिका न घेता आपल्या बाजूने येण्याचे आवाहन केले.
मीडियाशी संवाद साधताना झेलेन्स्की म्हणतात, 'पीएम मोदींसोबतची खूप चांगली झाली. युक्रेनमध्ये आल्याबद्दल मी मोदींचा खूप आभारी आहे. भारत हा जगातील अत्यंत महत्त्वाचा देश आहे आणि तो शांतता प्रस्थापित करण्यात मोठी भूमिका बजावू शकतो.आम्हाला भारतासोबतचे संबंध दृढ करायचे आहेत. युद्धाबाबत भारताने तटस्थ भूमिका न घेता आमच्या बाजूने यावे, अशी आमची इच्छा आहे.'
'अलीकडेत पीएम मोदींनी रशियाचा दौरा केला. पुतिन आणि पीएम मोदींमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली, हे मला माहित नाही. पण, पीएम मोदींच्या अधिकृत दौऱ्यात रशियाने युक्रेनवर हल्ला केला. यावरुन समजते की, रशियन राष्ट्राध्यक्ष भारताचा आणि भारताच्या पंतप्रधानांचा आदर करत नाही. त्यांचे आपल्या देशाच्या सैन्यावरही नियंत्रण नाही. युद्ध संपवण्यासाठी भारताने रशियाकडून तेल विकत घेणे थांबवावे,' असे आवाहन झेलेन्स्की यांनी यावेळी केले.
या भेटीनंतर पीएम मोदी काय म्हणाले?या भेटीदरम्यान पीएम मोदींनी रशिया-युक्रेन युद्धाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. 'युद्धाची भीषणता मन दुखावणारी असते. युद्ध लहान मुलांसाठी विनाशकारी आहे. युद्ध आणि हिंसाचार, हा समस्येवरचा उपाय नाही. संवाद आणि मुत्सद्दीपणा हाच या प्रदेशात स्थिरता सुनिश्चित करण्याचा एकमेव मार्ग आहे. शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांमध्ये भारत सक्रिय भूमिका बजावेल. आम्ही पहिल्या दिवसापासून शांततेच्या बाजूने आहोत. युक्रेनमध्ये शांतता नांदावी, अशी भारताची इच्छा आहे. भारत नेहमीच युक्रेनच्या पाठीशी उभा राहील. युद्धाबाबत भारताची भूमिका कधीच तटस्थ नव्हती, आम्ही नेहमीच शांततेच्या बाजूने आहोत,' असे पीएम मोदींनी स्पष्ट केले.
भारत-युक्रेनमध्ये चार करार भारत आणि युक्रेनने चार महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. दोन्ही देशांनी मानवतावादी मदत, कृषी, वैद्यकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवण्यास सहमती दर्शवली आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या युक्रेन दौऱ्यामुळे रशिया-युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध संपुष्टात आणण्यास मदत होईल, अशी आशा संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी व्यक्त केली आहे.