Volodymyr Zelensky: वोलोडिमीर जेलेन्स्कींनी अमेरिकन संसदेत दाखवला युक्रेनच्या विध्वंसाचा व्हिडिओ, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 08:18 PM2022-03-16T20:18:29+5:302022-03-16T20:25:36+5:30
Ukraine Russia War: ''आम्हाला युद्ध नको, शांतता हवी आहे. युद्ध थांबवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत, पण रशियाचे हल्ले सुरुच आहेत.''
वॉशिंग्टन: रशियासोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर जेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनी अमेरिकन संसदेला (US Congress) संबोधित केले. यादरम्यान सर्व अमेरिकन खासदारांनी जेलेन्स्की यांना उभे राहून अभिवादन केले. यावेळी झेलेन्स्की म्हणाले की, ''आम्हाला युद्ध नकोय, युद्ध थांबायला हवे. युद्ध थांबवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. पण, रशिया ऐकायला तयार नाही. ते सातत्याने आमच्यावर क्षेपणास्त्रांचा वापर करत आहे.''
Ukraine President Volodymyr Zelensky received a standing ovation during his address to US Congress
— ANI (@ANI) March 16, 2022
(Source: Reuters) pic.twitter.com/18hRnFyQfs
'रशियाला शरण जाणार नाही'
यावेळी जेलेन्स्की यांनी अमेरिकेला दुसऱ्या महायुद्धाची आठवण करुन दिली आणि युक्रेनच्या विध्वंसाचा व्हिडिओही अमेरिकन संसदेत दाखवला. जेलेन्स्की म्हणाले, ''रशिया फक्त आमच्या जमिनीवर नाही, तर आमच्या अधिकारांवरही हल्ला करतोय. काहीही झाले तरी, रशियाला शरण येणार नाहीत. अमेरिकेने रशियावर आणखी कठोर निर्बंध लादावेत.'' जेलेन्स्की यांनी आपल्या भाषणात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचेही आभार मानले.
यूएस संसदेला 9/11ची आठवण करुन दिली
जेलेन्स्की पुढे म्हणाले की, ''अमेरिकेतील लोकांसारखी सामान्य जीवनशैली आम्हाला युक्रेनमधील आमच्या लोकांसाठी हवी आहे. 1941 ची सकाळ आठवा, जेव्हा अमेरिकेवर हल्ला झाला होता, 11 सप्टेंबरचा तो दिवस आठवा जेव्हा अमेरिकेवर हल्ला झाला होता. अशाच प्रकारचे हल्ले दररोज आमच्यावर होत आहेत आणि आम्ही ते थांबू शकत नाही. आतापर्यंत रशियाकडून युक्रेनवर 1000 हून अधिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत, हल्ल्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे,''अशी माहिती जेलेन्स्की यांनी दिली.
'युक्रेनवर नो फ्लाय झोन नियम लागू करा'
जेलेन्स्की पुढे म्हणाले की, ''मला आतापर्यंत अमेरिकेने खूप काही दिले, आता मी आणखी एक मागणी करत आहे. युक्रेनवर नो फ्लाय झोनचा नियम लागू करा. हा नियम लागू केल्यावर रशिया आमच्यावर हल्ला करू शकणार नाही. रशियाकडून हल्ल्यासाठी ड्रोनचा वापर केला जातोय. मला माझ्या देशाचे रक्षण करायचे आहे. अमेरिकेच्या लोकांना वाटत असेल की, आम्ही आमच्या स्वातंत्र्याचे रक्षण केले पाहिजे, तर आमच्यासोबत या आणि युक्रेनच्या लोकांना मदत करा,''असे आवाहनही जेलेन्स्की यांनी यावेळी केले.