रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याच्या घटनेला आता ३०० दिवस पूर्ण होत आले आहेत. या काळात रशियाने हजारो क्षेपणास्त्रे डागली, परंतू नेटाने प्रतिकार करत युक्रेनी सैन्य आणि जनतेने रशियन सैनिकांना सळो की पळो करून सोडले आहे. वर्ष संपत आले तरी युक्रेनी सेना शरण येत नाहीय, यामुळे एकीकडे रशिया गळीतगात्र झालेला असताना दुसरीकडे एवढे दिवस देशातच ठाण मांडून बसलेल्या युक्रेनी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी पहिल्यांदाच देश सोडला आहे.
वोलोदिमीर झेलेन्स्की हे अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. व्हाईट हाऊसमध्ये त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अमेरिकेकडे शस्त्रास्त्रांची मदत मागितली आहे. बायडन यानी देखील ती मान्य करत युक्रेनला १.८ अब्ज डॉलर्सची मदत देण्याचे जाहीर केले आहे. याचबरोबर युक्रेनला पॅट्रियट मिसाईल डिफेंस सिस्टिम देण्यात येणार आहे.
युद्ध कितीही काळ चालुदे आम्ही शरणागती पत्करणार नाही, असे झेलेन्स्की यांनी सांगितले. १० महिन्यांवासून सुरु असलेल्या या युद्धात अमेरिका मोठा मदत करणारा देश ठरला आहे. रशियाची नाराजी आणि पुतीन यांच्या धमक्यांना न जुमानता अमेरिका आम्हाला सतत मदत करत आहे. बायडेन यांनी आणखी ४५ अब्ज डॉलर्सची मदत देणार असल्याचे आश्वासन दिले आहे, असे झेलेन्स्की म्हणाले.
रशियापासून धोका असल्याने झेलेन्स्की यांना अमेरिकन हवाई दलाच्या विमानाने वॉशिंग्टनला नेण्यात आले. व्हाईट हाऊसमधील बैठकीनंतर झेलेन्स्की यांनी अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त सत्राला संबोधित केले. अमेरिकेच्या खासदारांनी त्यांना उभे राहून अभिवादन केले. 'आमच्याकडे बंदुका आहेत, त्याबद्दल धन्यवाद. पण ते पुरेसे आहे का? खरे सांगायचे तर, नाही. रशियन सैन्याला पूर्णपणे मागे टाकण्यासाठी आम्हाला आणखी बंदुका आणि गोळ्यांची गरज आहे, असे ते म्हणाले.