Volodymyr Zelenskyy vs Vladimir Putin: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी एका नवीन युक्रेनियन ड्रोन क्षेपणास्त्राबद्दल (Palianytsia) माहिती दिली. 'हे शस्त्र युद्धात रशियापेक्षा वरचढ ठरेल,' असा विश्वास झेलेन्स्की यांनी व्यक्त केला. याचवेळी त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची खिल्ली उडवली आणि त्यांना 'रेड स्क्वेअरचा आजारी म्हातारा माणूस' (sick old man from red square) असे संबोधले. एकीकडे रशियासोबत युद्ध सुरु असताना, युक्रेनने शनिवारी ३३वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. यात बोलताना झेलेन्स्की म्हणाले की, युक्रेन आतापर्यंत रशियाविरुद्ध वापरत असलेल्या देशांतर्गत बनवलेल्या ड्रोनपेक्षा पॅलियानिट्सिया हे नवीन शस्त्र खूपच वेगवान आणि अधिक शक्तिशाली आहे.
पुतीन यांची उडवली खिल्ली
झेलेन्स्कीने इशारा दिला की, युक्रेन जेव्हा प्रतिकार करतो त्यावेळी कशापद्धतीने युद्ध लढतो हे आता रशियाला समजेल. रशियामधील विविध टार्गेटवर यशस्वीरित्या हल्ला करण्यासाठी हे नवीन शस्त्र वापरले गेले आहे. पण या शस्त्राने कुठे कुठे हल्ले केले गेले, या जागांची माहिती झेलेन्स्की यांनी उघड केली नाही. उलट त्यांनी रशियाचे ७१ वर्षीय राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची खिल्ली उडवली. झेलेन्स्की म्हणाले, "रेड स्क्वेअरमधील आजारी म्हाताऱ्याच्या कोणत्याही धमक्यांचा आमच्यावर काहीही परिणाम होणार नाही."
फेब्रुवारी २०२२ पासून युक्रेनवर हजारो क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला करणाऱ्या रशियाने युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यांना 'दहशतवादी कारवाया' असे संबोधले आहे. पुतीन यांचे सैन्य युक्रेनच्या पूर्व भागात कूच करत असून त्यांनी आतापर्यंत देशाचा सुमारे १८ टक्के भाग ताब्यात घेतला आहे. या साऱ्या कारवायांवर बोलताना झेलेन्स्की म्हणाले, "मला पुन्हा एकदा ठणकावून सांगायचे आहे की आमचे नवीन शस्त्रास्त्रांचे निर्णय, ज्यात पॅलिनिट्सियाचा समावेश आहे, हा आमचा युद्धात संघर्ष करण्याचा खरा मार्ग आहे. आमचे काही भागीदार निर्णय घेण्यास विलंब करत आहेत, पण आम्ही मागे हटत नाही," असेही झेलेन्स्की पत्रकार परिषदेत म्हणाले.
क्षेपणास्त्राला असे नाव का देण्यात आले?
'Palianytsia' हा युक्रेनियन प्रकारचा ब्रेड आहे. युक्रेनियन म्हणतात की हा शब्द रशियन लोकांना उच्चारणे फार कठीण आहे. ड्रोन क्षेपणास्त्राबाबत झेलेन्स्की म्हणाले, 'रशियाने त्यांच्यावर कशामुळे हल्ला केला हे सांगणे खूप कठीण जाईल.'