Russia-Ukraine War: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी बुधवारी जपानच्या संसदेत दिलेल्या भाषणात अत्यंत महत्वाचं आणि तितकंच चिंता वाढवणारं विधान केलं आहे. रशियाकडून सरीन (Sarin) सारख्या घातक रासायनिक क्षेपणास्त्रांचा हल्ला करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मला मिळाली आहे, असं जेलेन्स्की यांनी जपानच्या संसदेला संबोधित करताना म्हटलं आहे. जर अण्वस्त्र हल्ला जर करण्यात आलाच तर जग त्यावर काय प्रतिक्रिया देईल यावरही चर्चा केली गेली पाहिजे, असंही जेलेन्स्की म्हणाले.
सरीन हे अत्यंत विषारी कृत्रिम ऑर्गनोफॉस्फरस फॉर्म्युला आहे. हे रंगहीन आणि गंधहीन द्रव आहे. त्याच्या अफाट सामर्थ्यामुळे ते रासायनिक शस्त्र म्हणून वापरलं जातं. "जपानी लोक सरीन शस्त्राशी चांगलेच परिचित आहेत कारण 1995 मध्ये टोकियो सबवे सिस्टीमवर झालेल्या हल्ल्यात त्याचा वापर केला गेला होता, ज्यात 13 लोक मारले गेले आणि हजारो जखमी झाले होते", असंही जेलेन्स्की म्हणाले. युक्रेनच्या अध्यक्षांनी यावेळी चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पाजवळील धोकादायक परिस्थितीकडंही लक्ष वेधलं, जिथं रशियन हल्ल्यामुळे आग लागली होती. आता या अणुऊर्जा प्रकल्पावरही रशियन सैनिकांनी ताबा घेतला आहे.
रशियाच्या हल्ल्यानंतर जेलेन्स्की आपली म्हणजेच युक्रेनची बाजू मांडण्यासाठी आणि पाठिंबा मिळवण्याठी विविध देशांच्या संसदेत भाषण देत आहेत. यात त्यांनी आपल्यापर्यंत इटली, जर्मनी, यूके, कॅनडा आणि अमेरिकेसह इतर जी-७ प्रमुख औद्योगिक देशांच्या सदनांमध्ये व्हर्च्युअल पद्धतीनं भाषण दिलं आहे. रविवारी जेलेन्स्की यांनी इस्रायली संसदेला संबोधित केलं होतं.