बँकॉक- थायलंडमधील गुहेत अडकलेल्या 12 मुलांना बाहेर काढण्यात अजूनही यश आलेले नाही. यामुलांबरोबर त्यांचा 25 वर्षांचा प्रशिक्षकही आतच अडकलेला आहे. दोन दिवसांपुर्वी ही मुले सुखरुप असल्याचे लक्षात आले आणि त्यांची तब्येतही ठिक असल्याचे व्हीडिओतून स्पष्ट करण्यात आले. मात्र जोरदार पावसामुळे व पुरामुळे त्यांना गुहेतून बाहेर काढता आलेले नाही. त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या नौदलाच्या माजी सैनिकाचा ऑक्सीजन अभावी मृत्यू झाला आहे.
आतमध्ये अडकलेल्या मुलांना जीवनावश्य वस्तू आणि खाद्य पुरवण्याच्या मोहिमेत सलग पाच तास काम करावे लागल्यामुळे त्या सैनिकाकडील ऑक्सीजनचा साठा संपला आणि त्याचा मृत्यू झाला. या सैनिकाने नौदलाची नोकरी सोडली होती मात्र बचाव कार्यात सहभागी होण्यासाठी तो आला होता. त्याच्यामृत्यूमुळे गेले अनेक दिवस चाललेल्या बचावकार्य मोहिमेतील अडथळे व धोके अधोरेखित झाले असून या मुलांना परत जिवंत बाहेर काढणे सोपे नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. सॅमन कुनोन्ट असे या व्यक्तीचे नाव आहे.
या मोहिमेत सहभागी झालेल्या अॅपारकोर्न यूकोंगक्यू यांनी एका व्यक्तीचा मृत्यू झाला तरी आम्ही कार्य सुरुच ठेवणार आहोत असे सांगितले. पावसामुळे गुहेतील ऑक्सीजनचे प्रमाण 15 टक्क्यांनी घसरल्यामुळे मुलांपर्यंत एक वायूनलिका टाकण्याचा प्रयत्नही बचावकार्यात केला जात आहे.