ऑनलाइन लोकमत
रोम, दि. 14 - लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपला इटलीमध्ये तब्बल 3 दशलक्ष युरो (सुमारे 21 कोटी रुपये) इतका दंड ठोठावण्यात आला आहे. यूजर्सची खासगी माहिती परवानगीविना फेसबुकसोबत शेअर केल्याने व्हॉट्सअॅपला हा दंड ठोठावण्यात आला आहे.
गेल्या वर्षी युरोपीय संघाच्या 28 सदस्यीय समितीने यूजर्सची खासगी माहिती फेसबुकसोबत शेअर न करण्याची सक्त ताकीद दिली होती. या अटीचं उल्लंघन करणं व्हॉट्सअॅपला चांगलंच महागात पडलं असून कंपनीला 21 कोटी रूपये भरावे लागणार आहेत.
मार्क झुकरबर्गच्या फेसबुकनं 2014 मध्ये व्हॉट्सअॅप विकत घेतलं होतं. त्यावेळी व्हॉट्सअॅप यापुढेही स्वतंत्र कंपनी म्हणूनच काम करेल आणि युजर्सच्या परवानगीशिवाय फेसबुक आणि व्हॉट्सअॅपमध्ये माहिती शेअर होणार नाही असं कंपनीकडून सांगिण्यात आलं होतं. परंतु, 2016 मध्ये अचानक कंपनीने प्रायव्हसी पॉलिसी बदलली. "डेटा शेअरिंग"ला संमती न दिल्यास यूजर्सना व्हॉट्स अॅपचा वापरच करता येत नव्हता. त्यामुळे यूजर्सच्या माहितीची देवाणघेवाण सुरू झाली.
"डेटा शेअरिंग"ला भारतासह अनेक देशांतून मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. भारताच्या सर्वोच्च् न्यायालयात या प्रखऱणी एक याचिकाही टाकण्यात आली असून याप्रकरणी कडक कायदा बनवण्याच्या दिशेने काम सुरू आहे असं सरकारकडून कोर्टात सांगण्यात आलं आहे.