जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. भारतीय वेळेनुसार सायंकाळी साडे चार वाजता मतदान सुरु झाले आहे. याचबरोबर तिथे मतमोजणीलाही सुरुवात झाली आहे. राज्यांनुसार मतदान सुरु होण्याची वेळ वेगवेगळी ठेवण्यात आली आहे.
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणूक होत आहे. न्यूयॉर्क टाईम्सच्या एका सर्व्हेनुसार कमला हॅरिस यांना ट्रम्प यांच्यापेक्षा १ टक्के जास्त मते मिळण्याचा अंदाज आहे. सर्व्हेनुसार कमला यांना ४९ टक्के मते मिळताना दिसत आहेत. तर टॅम्प यांना ४८ टक्के मते मिळताना दिसत आहेत.
पेनसिल्व्हेनिया हे स्विंग स्टेट म्हणून प्रसिद्ध आहे. 12 पैकी 10 निवडणुकीत या राज्यातील लोकांनी ज्या उमेदवाराला मतदान केले तोच राष्ट्राध्यक्ष बनला आहे. यामुळे या राज्यातील मतदानावर सर्वांची भिस्त असणार आहे.
कॅनडाच्या सीमेला लागून असलेल्या न्यू हॅम्पशायरमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे. तर न्यू हॅम्पशायरच्या डिक्सविले नॉचमध्ये मतमोजणी सुरू झाली असून आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांना प्रत्येकी तीन मते मिळाली आहेत. डिक्सविले नॉचमध्ये बायडेन यांना सर्वच्या सर्व मते मिळाली होती. परंतू आता हा आकडा निम्म्यावर आला आहे.