ऑनलाइन लोकमत
मियामी, दि. ८ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीतील मतदानाला आता अवघे काही तास उरलेले असून राष्ट्राध्यक्षपदाची माळ हिलरी वा ट्रम्प यांच्यापैकी कोणाच्या गळ्यात पडणार हे लवकरच स्पष्ट होईल. (भारतीय वेळेनुसार) आज सायंकाळी मतदानास सुरूवात होणार असून उद्या सकाळपर्यंत निकाल जाहीर होईल. दरम्यान या मतदानातील विशेष बाब म्हणजे अवकाशात असणाऱ्या अमेरिकन अंतराळवीरानेही या निवडणुकीसाठी मतदान केले आहे.
'नासा' या अवकाश संशोधन संस्थेने ही माहिती दिली असून शेन किमब्रॉघ असे त्या अंतराळवीराचे नाव आहे. शेन किमब्रॉघ यांनी १९ ऑक्टोबर रोजी रशियाच्या सोयूझ रॉकेटद्वारे ४ महिन्यांच्या मोहमेसाठी २ रशियन साथीदारांच्या सहाय्याने आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्राच्या दिशेने उड्डाण केले.
टेक्सास कायद्याअंतर्गत १९९७ सालापासून अमेरिकन अंतराळवीर मोहिमेवर असताना अवकाशातून अशाचप्रकारे मतदान करतात. डेव्हिड वुल्फ हे अंतराळातून मतदान करणारे पहिले अंतराळवीर होते. त्यांनी रशियाच्या 'मिर' या अवकाश स्थानकातून आपले मत पृथ्वीवर पाठवले होते. नासाचे बहुतांश अंतराळवीर नासाच्या अवकाश मोहीमांचे केंद्र असणाऱ्या हाऊस्टन आणि जॉन्सन स्पेस सेंटर येथे राहतात.
या निवडणुकीसाठी डेमॉक्रॅटिक पक्षातर्फे हिलरी क्लिंटन तर रिपब्लिकन पक्षातर्फे डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चुरशीची लढत आहे.
Voting can be out of this world! Literally. See how @NASA_Astronauts cast their vote on @Space_Stationhttps://t.co/3paZHLG9aX#Election2016pic.twitter.com/VNInwsSAcv— NASA (@NASA) 6 November 2016