रशियात सध्या काय सुरुय याचा नेम नाहीय. हा देश आता आश्चर्यांनी भरलेला आहे. जेव्हा मॉस्कोवर युक्रेनी ड्रोनने हल्ले केले तेव्हा तेथील लोक हैराण झाले होते. काही इमारतींना नुकसान झाले, यानंतर रुबलमध्ये घसरण झाली. एका डॉलरला १०० रुबल एवढी किंमत मोजावी लागत होती. आता पुतीन यांच्याविरोधात बंड करणारा आणि रशिया ताब्यात घेण्यास निघालेल्या वॅगनर ग्रुपचा म्होरक्या येवगेनी प्रिगोझिनच्या विमानाला अपघात झाला, परंतू याचा रशियन नागरिकांना धक्का बसला नाही.
अनेक रशियनांना याचेच आश्चर्य वाटले होते की हे आधी का नाही झाले. काही महिन्यांपूर्वी प्रिगोझिनच्या फौजा मॉस्को ताब्यात घेण्यासाठी निघाल्या होत्या. परंतू, दोनच दिवसांनी हे बंड शमले होते आणि वॅगनर ग्रुपच्या फौजा मागे बेस कॅम्पमध्ये गेल्या होत्या. या बंडानंतर प्रिगोझिनचे काहीही होऊ शकते, अशी अटकळ होतीच. परंतू, त्याला अटकेपासूनही अभय देण्यात आले होते.
प्रीगोझिनने स्वतःच्या मृत्यूच्या हुकुमावर स्वाक्षरी केली होती, असे त्याच्या बंडानंतर म्हटले जात होते. प्रीगोझिन कधी आणि कसा मरेल हे कोणालाच माहीत नव्हते. प्रीगोझिनच्या बेलारुसमध्ये परत जाण्यानंतर मॉस्को ते सेंट पीटर्सबर्गपर्यंत त्याची सक्रीयता वाढली होती. यामुळे पुतीन अस्वस्थ झाले होते. पुतीन यांची ताकद आधीपेक्षा जास्त कमजोर झाल्याचा लोकांचा समज होऊ लागला होता.
विमान अपघातानंतर सुमारे एक तासानंतर, रशियन फेडरल एव्हिएशन एजन्सी रोसावियात्सियाने एक निवेदन जारी केले आहे. प्रीगोझिनचे नाव प्रवाशांच्या यादीत होते, असे त्यांनी म्हटले आहे. ही एजन्सी एवढ्या झटकन प्रतिक्रिया देत नाही, परंतू यावेळी तिने सर्वांना आश्चर्यचकीत केले आहे. लोक प्रीगोझिनच्या मृत्यूला कटकारस्थान मानत आहेत.
प्रीगोझिनचे विमान मॉस्कोहून सेंट पीटर्सबर्गला जात होते आणि त्यात सात प्रवासी आणि तीन क्रू सदस्य होते. हे विमान टव्हर भागात पोहोचल्यावर त्याचा स्फोट झाला. विमानातील सर्व 10 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे.